जालिंदर शिंदे
घाटनांद्रे : शूर पराक्रमी ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे वंशज व शिवाजी महाराजांच्या आजोळचे जवळचे नातलग सरदार शहाजीराजे श्ािंदे यांच्या कुंडलापूर (ता. कवठेमहांकाळ) येथील स्मारकाची दुरवस्था झाली आहे. इमारतीवरचे प्लॅस्टर नष्ट झाले असून, चिराही निखळल्या आहेत. वास्तूचा काही भाग झुडपांच्या विळख्यात अडकून निकामी होत आहे. पुरातत्व विभागाने याची डागडुजी करून हा ऐतिहासिक वारसा सर्वसामान्यांसमोर आणावा, अशी मागणी होत आहे.
कवठेमहांकाळ शहरापासून उत्तरेला सुमारे दहा किलोमीटरवर कुंडलापूर गावालगत पूर्वेला हे ऐतिहासिक स्मारकस्थळ आहे. परिसरातील वाघोली, गर्जेवाडी, ढालगाव (सध्याचे दालगाव), तिसंगी, कुंदनग्राम (सध्याचे कुंडलापूर), इरली (सध्याचे इरळी) या गावांची जहागिरी श्ािंदे यांच्याकडे होती. त्याकाळी आदिलशहाची सत्ता होती. त्यावेळी अफजलखान चाल करण्यासाठी येथूनच म्हणजे विजापूर-गुहागर मार्गावरून प्रतापगडाकडे जात असताना, त्याची रसद तोडण्याच्या निर्धाराने शहाजीराजे शिंदे बाहेर पडले. त्यांच्याबरोबर सैन्यासह सावित्रीबाई व सईबाई या दोन पत्नी होत्या.
यावेळी नागज घाटात जोरदार युद्ध होऊन शिंदे यांना वीरमरण आले. पतीच्या मृत्यूची वार्ता कळताच दोन्ही पराक्रमी पत्नीनी मोठ्या शर्थीने त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला व कुंडलापुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर दोघीही सती गेल्या. शिंदे यांच्या विश्वासू सैनिकांनी त्यांच्यासह इमानी कुत्रा व घोड्यांची स्मारके बांधली. कालांतराने आदिलशहाच्या सैन्याने याची प्रचंड नासधूस केली. तथापि आज त्यांच्याबद्दलची म्हणावी तेवढी माहिती उपलब्ध होत नाही व समोर येत नाही.
शिंदे यांच्या पराक्रमाची महती सांगणारे हे स्मारक दुर्लक्षित आहे. तेथे शीलालेखावर मोडी लिपीतील काही अक्षरे, चौथरे, गावकुस (तट), सतीचा हात, गावाच्या वेशीचे अवशेष, सतीची शिळा अशा ऐतिहासिक पाऊलखुणा पाहावयास मिळतात. इमारतीचे प्लॉस्टर पूर्णत: निकामी झाले असून, चिरा निखळल्या आहेत. काही भाग झुडपाच्या विळख्यात आहे. त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी पुरातन विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे.
वास्तू बनली मद्यपींचा अड्डा!ही वास्तू ज्वलंत पराक्रमाची साक्ष देणारी आहे. त्याची महती जनतेसमोर येणे गरजेचे आहे. चिरा निकामी झाल्याने वास्तूचे दगडे निसटले आहेत. ती कोणत्याही क्षणी जमीनदोस्त होऊ शकते. सध्या ती मद्यपींचा अड्डा बनली आहे. - प्रमोद दिवाण (इतिहासप्रेमी)पुरातत्व विभागाकडे पाठपुरावा करू!कुंडलापूर गावाची अस्मिता असणारे, पराक्रमी सरदार शहाजी राणोजी शिंदे यांचे समाधीस्थळ दुर्लक्षित असून, यापुढे जनतेच्या रेट्यावर पुरातत्व विभागाकडून अथवा लोकवर्गणीतून नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- दीपक चव्हाण, अध्यक्ष, कुंडलापूर सोसायटी