शीतल पाटील - सांगली -विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सांगली व मिरज या दोन मतदारसंघात नगरसेवकांच्या भूमिकेवर त्या-त्या पक्षाच्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे. प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसचे नगरसेवक आघाडीवर दिसत आहेत, तर राष्ट्रवादीचे नगरसेवक अजूनही तळ्यात-मळ्यात आहेत. त्यांना साहेबांच्या आदेशाची प्रतीक्षा आहे. स्वाभिमानी आघाडीतील नगरसेवकांच्या टोपीचे व गळ्यातील पट्ट्यांचे रंग केव्हाच बदलले आहेत. महापालिका क्षेत्र दोन विधानसभा मतदारसंघात विभागले गेले आहे. त्यामुळे विधानसभेची हद्द बदलल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांच्या नगरसेवकांनी सोयीची भूमिका घेतली आहे. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व स्वाभिमानी आघाडी असे तीन पक्ष कार्यरत आहेत. सांगलीतील काँग्रेसचे नगरसेवक मदन पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. अजूनही काही नगरसेवक प्रचारापासून दूर आहेत. काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी बंडखोरी केली. पण त्यांच्या सूनबाई नगरसेविका अनारकली कुरणे या मदन पाटील यांच्यासाठी मते मागत आहेत. काँग्रेसचे दिगंबर जाधव अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यांच्या पत्नी नगरसेविका पद्मिनी जाधव मात्र त्यांच्या पाठीशी आहेत. या निवडणुकीत सर्वात मोठी कोंडी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची झाली आहे. निवडणुकीची घोषणा होताच मदन पाटील यांनी राष्ट्रवादीवर तोफ डागली होती. तेव्हा राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बैठक घेऊन ताकद दाखविण्याची भीमगर्जना केली. काँग्रेस व मदन पाटील यांच्यावर टीकेची झोड उठवत राष्ट्रवादीने स्वतंत्र उमेदवार देण्याची मागणी केली होती. कालांतराने आघाडीत ताटातूट होऊन राष्ट्रवादीही मैदानात उतरली. आता मात्र राष्ट्रवादीचे नगरसेवक इकडे-तिकडे पळत आहेत. आतापर्यंत या नगरसेवकांना केवळ महापालिका निवडणुकीतच राष्ट्रवादीसाठी मते मागावी लागत होती. विधानसभा व लोकसभेवेळी राष्ट्रवादी नेहमीच सोयीची भूमिका घेत असे. त्यांची ही सवयच आता पक्षाच्या आड येऊ लागली आहे. प्रचाराचा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी, अद्याप राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक प्रचारापासून दूर आहेत. पडद्याआडच्या हालचाली पाहता, अनेक नगरसेवक भाजप व काँग्रेसच्या प्रचारासाठी सरसावल्याचे दिसत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश पाटील यांना एकाकी लढत द्यावी लागत आहे. या नगरसेवकांना ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांच्या निरोपाची प्रतीक्षा आहे. भाजप, जनता दल व इतर पक्षांच्या स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांत फूट पडली आहे. आ. संभाजी पवार यांचा गट शिवसेनेत दाखल झाला आहे. भाजपशी निष्ठावंत असलेले नगरसेवक मात्र गाडगीळ यांच्या प्रचारात आहेत.अपक्ष नगरसेवक सुसाटमहापालिकेतील अपक्ष नगरसेवकांनीही सोयीची भूमिका घेतली आहे. पालिकेत एका पक्षासोबत, तर निवडणुकीत दुसऱ्याच पक्षाचा झेंडा त्यांनी खांद्यावर घेतला आहे. राष्ट्रवादीला पाठिंबा देणारे नगरसेवक धनपाल खोत भाजपसोबत आहेत, तर स्वाभिमानी आघाडीतील उमेश पाटील काँग्रेसच्या प्रचारात दिसत आहेत. नगरसेवक धीरज सूर्यवंशी, महेंद्र सावंत, स्नेहल सावंत यांनी अद्याप भूमिका जाहीर केलेली नाही. काँग्रेसला पाठिंबा देणारे अनिल कुलकर्णी मिरजेत भाजपच्या पाठीशी आहेत. एकूणच अपक्ष नगरसेवकांची गाडी या निवडणुकीत सुसाट सुटली आहे.
नगरसेवकांचे बळ कोणाच्या पदरात?
By admin | Published: October 06, 2014 10:15 PM