तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी आमने-सामने आल्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपचे नेते आणि खासदार संजयकाका पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीच्या पध्दतीवर टीका करून खळबळ उडवून दिली आहे. मात्र दुसरीकडे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांचा गळ्यात गळा आहे. खासदारांच्या या दुहेरी भूमिकेमुळे तासगाव आणि कवठेमहांकाळचे राष्ट्रवादी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. सांगा खासदार कोणाचे? असाच प्रश्न त्यांना पडल्याचे दिसून येत आहे. तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नेतृत्व मानणारा राष्ट्रवादीचा एकच गट आहे. या दोन्ही तालुक्यांचे राष्ट्रवादीचे नेतृत्व आमदार सुमनताई पाटील यांच्याकडे आहे. तासगावात बाजार समितीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच बिनविरोधचा पायंडा मोडीत निघाला असून, भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आले आहेत. बाजार समितीवर वर्चस्व राखण्यासाठी दोन्ही पक्षांकडून शह-काटशहच्या राजकारणाला वेग आला आहे. खासदार संजय पाटील यांनी राष्ट्रवादीला धक्का देण्यासाठी राष्ट्रवादीतील काही कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला आहे. इतकेच नाही, तर राष्ट्रवादीने बाजार समितीसाठी उमेदवारी देताना आर्थिक कुवतीचा निकष लावूनच उमेदवारांची निवड करण्याचा घातक पायंडा पाडला असल्याचा आरोप केला आहे. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी तालुक्याचे पालकत्व आमदार जयंत पाटील यांच्याकडे दिले आहे. सूतगिरणी आणि बाजार समितीच्या उमेदवारांची यादी अंतिम करताना स्वत: जयंत पाटील यांनी लक्ष घातले होते. असे असताना खासदार पाटील यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवार निवडीवरच टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या माजी संचालकांच्या भ्रष्टाचाराचा पोलखोलही लवकरच करणार असल्याचा इशाराही खासदार पाटील यांनी दिला आहे. तासगाव तालुक्यात राष्ट्रवादीला खिंडीत गाठण्यासाठी खासदारांकडून आक्रमक धोरण स्वीकारले जात असतानाच, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी जवळीक साधली आहे. या बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात कवठेमहांकाळ तालुक्याचा समावेश होत असल्यामुळे या तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खासदारांशी जुळवून घ्यावे लागणार आहे. दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेतृत्व एकच असल्यामुळे, एकीकडे तासगाव तालुक्यात खासदारांकडून होणारा हल्लाबोल, तर दुसरीकडे कवठेमहांकाळ तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादीची सलगी, यामुळे ‘सांगा खासदार कोणाचे?’ असाच प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पडला आहे.
सांगा खासदार संजयकाका कोणाचे?
By admin | Published: July 21, 2015 12:46 AM