अशोक पाटील ।इस्लामपूर : इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील आष्टा, वाळवा, मिरज पश्चिम भागासह बागणी जिल्हा परिषद मतदार संघातील गावांना महत्त्व आले असून, आमदार जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक यांनी या भागात संपर्क वाढविला आहे. आता बागणी परिसरात प्रसिध्द असणाºया अडकित्त्याने कोण कोणाची राजकीय सुपारी फोडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जयंत पाटील यांचे वर्चस्व असलेली वाळवा तालुक्यातील ४९ गावे शिराळा मतदारसंघात आहेत. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील मिरज पश्चिम भागासह आष्टा, वाळवा, कोरेगाव, बागणी आणि काही गावांना महत्त्व आले आहे. या गावांत मुळातच राष्ट्रवादीचे मोठे गट आहेत. या गटांत मतभेद असल्याने याचा फायदा सदाभाऊ खोत यांनी उचलला आहे. राष्ट्रवादीतील काही प्यादी हाताशी धरून बागणी परिसरात ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे.इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत विकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला धक्का दिल्यानंतर खोत यांनी पुत्र सागर खोत यांना बागणी जि. प. गटात उमेदवारी दिली आणि आष्टा परिसरात वर्चस्व असणाºया राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे गटाला आव्हान दिले. मात्र राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांनी अपक्ष म्हणून बाजी मारली. त्यानंतर विलासराव शिंदे यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करुनखोत यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे समीकरणे बदलली आहेत. त्यातूनच सर्व पक्षांनी या मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे.
खोत आणि वैभव शिंदे यांनी एकत्र येऊन आष्टा शहरासह बागणी परिसरात भाजपला ताकद देण्याचे काम सुरु केले आहे. त्यामुळे संभाजी कचरे यांनी थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घेत, वैभव शिंदे व खोत यांना शह देण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष सुरु असतानाच नानासाहेब महाडिक गटानेही आष्टा शहरासह बागणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
बागणी येथे महाडिक मल्टीपर्पज सोसायटीची शाखा सुरू करण्यात येणार आहे. याचे उद्घाटन लवकरच महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्याहस्ते होणार आहे. हे सर्व भाजपचे नेते कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याने, महाडिक गटाची नेमकी भूमिका काय, याची उत्सुकता लागून राहिली आहे.
मी राष्ट्रवादी वगळता सर्वच पक्षांचा आहे. बागणीतील जनतेने माझ्यावर विश्वास दाखवला आहे. सध्या तरी मी कोणाचेही नेतृत्व मानत नाही. सदाभाऊ खोत, नानासाहेब महाडिक, राहुल महाडिक, निशिकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे.- संतोष घनवट, सरपंच, बागणी.