अशोक पाटील ।इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. मात्र इस्लामपूर आणि शिराळा मतदार संघातील विद्यमान आमदार आधीच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांच्याविरोधात पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांनी शड्डू ठोकले आहेत. यामध्ये काहींनी पक्के ठरवले आहे, तर काहींनी ऐनवेळी तलवार म्यान करायची, मात्र हवा टिकवून ठेवण्याची खेळी सुरू केली आहे.
इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात भाजपमधून नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्या समर्थकांनी ‘दादाच उमेदवार, आमचं ठरलंय’ असा नारा सुरू केला आहे. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, असे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार सांगत आहेत. त्यामुळे युतीचे नेते तोडगा काढून कोणाला तलवार म्यान करण्याचा आदेश देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. भाजपचे विक्रम पाटील, महाडिक गटाचे राहुल महाडिक, हुतात्मा गटाचे गौरव नायकवडी, वैभव शिंदे यांची एकत्र मोट बांधण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. यातील काही नेते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे प्रयत्न करू लागले आहेत.
शिराळा मतदार संघात आमदार शिवाजीराव नाईक यांना उमेदवारी देण्याचे भाजपने ठरवले आहे, असे नाईक गटातून सांगितले जात आहे, तर महाडिक युवाशक्तीचे सम्राट महाडिक यांनी निवडणूक लढवायचीच, असे ठरवून शिराळा येथे प्रचाराचा नारळही फोडला. त्यामुळे नाईक-महाडिक यांच्यातील कोणाला तलवार म्यान करायला सांगायचे, हा पेच भाजपच्या नेत्यांपुढे आहे. भाजपप्रमाणे काँग्रेस आघाडीमध्येही पेच आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. यामध्ये आमदार जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
दोघांच्या भांडणात...इस्लामपूर मतदार संघात राष्ट्रवादीविरोधात लढणाऱ्या इच्छुकांची गर्दी आहे. भाजप, शिवसेनेच्या इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. परंतु हा मतदारसंघ कोणाला द्यायचा, यावर विचार सुरू आहे. या दोघांच्या भांडणात तिसºयालाच उमेदवारी जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
शिराळ्यात तिरंगी लढतशिराळा मतदारसंघात आतापर्यंत मानसिंगराव नाईक आणि शिवाजीराव नाईक यांच्यातच संघर्ष पहायला मिळाला आहे. त्यातच सम्राट महाडिक यांनीही प्रचाराचा नारळच फोडला आहे. या तिघांत कोण बाजी मारणार, याची चर्चा आता सुरू झाली आहे.