लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहराचा व्यापार वाढत चालला आहे. मार्केट यार्ड व गणपती पेठेत नवीन व्यापारासाठी जागा नाही. त्यासाठी शासनाने कवलापूर विमानतळाची १६६ एकर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेत हळद, गूळ, बेदाणा, फळे, भाजीपाल्यासह बिल्डिंग साहित्याचे होलसेल मार्केट उभे राहू शकते, असे मत व्हिजन सांगली फोरमचे मुख्य समन्वयक सुरेश पाटील यांनी बुधवारी व्यक्त केले.
सांगलीत फोरमची बैठक झाली. यावेळी उद्योजक दीपक शिंदे-म्हैसाळकर, आनंदराव पाटील, विकास कार्डिले, दिनकर नायकवडी, सुभाष आर्वे, प्रकाश पाटील, रवींद्र यादव, बाबासाहेब मुळीक, सागर आर्वे, राजगोंडा पाटील उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी फोरमची स्थापना केली आहे. कृषी, व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, सहकार या क्षेत्राचा मास्टर प्लॅन तयार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी फोरमच्या वतीने शासन व वित्तीय संस्थांकडे पाठपुरावा केला जाणार आहे. सध्या शहरात होलसेल मार्केटसाठी जागा उपलब्ध नाही. त्यासाठी कवलापूर विमानतळाची जागा शासनाने द्यावी. त्या ठिकाणी अन्नप्रक्रिया युनिटही उभारता येईल. याशिवाय वखार भागातील ट्रक टर्मिनलचा विकास, काळी खण सुशोभीकरण, कृष्णा घाटावर पर्यटन, आदींसाठीही पाठपुरावा केला जाणार आहे.
आटपाडीचे आनंदराव पाटील यांनी तालुक्यात लिंबू, सीताफळ, मिरची, फुले, भाजीपाला, डाळींब यांवर प्रक्रिया उद्योगाची निर्मिती झाली पाहिजे. पडीक जमिनीवर औद्योगिक वसाहत स्थापन केल्यास तालुक्याचा विकास होऊ शकतो, असे मत मांडले. प्रकाश पाटील यांनी कृषी पर्यटनाचे हब तयार करण्यासाठी आराखडा तयार करण्याची तयारी दर्शविली. सुभाष आर्वे यांनी द्राक्ष, डाळींब, आंबा पिकावर संशोधन केंद्र, शेतकऱ्यांसाठी चर्चासत्रे, द्राक्ष महोत्सव आदी कार्यक्रम फोरमच्या वतीने घ्यावेत, अशी सूचना केली. बाबासाहेब मुळीक यांनी विटा बायपास, मिरज-विटा- फलटण रेल्वेमार्गासाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली.