सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी लागणार, हा उत्सुकतेचा विषय बनला आहे. सांगली जिल्ह्यातील भाजपचे आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, शिवसेनेचे आ. अनिल बाबर हे मंगळवारी रात्रीच मुंबईत दाखल झाले असून, मंत्रिमंडळातील समावेशाबाबत कोणतेच चित्र स्पष्ट झाले नव्हते. त्यामुळे जिल्ह्यातील आमदारांमध्येही संभ्रमावस्था निर्माण झाली होती.सांगली जिल्ह्यात आठपैकी दोन जागा भाजपने, तर एक जागा शिवसेनेने जिंकली आहे. गतवेळच्या तुलनेत सांगली जिल्ह्यात भाजपच्या दोन जागा कमी होऊन पक्षाची मोठी पिछेहाट झाली आहे. त्यामुळे भाजपला याठिकाणी पुन्हा बळ देण्यासाठी दोन्हीपैकी एका आमदाराच्या गळ््यात मंत्रिपदाची माळ पडणार आहे. मागील मंत्रिमंडळात मिरजेचे सुरेश खाडे यांना संधी मिळाली होती. त्यामुळे यावेळीही त्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर आ. सुधीर गाडगीळ यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आले आहे. त्यांची कार्यपद्धती आणि प्रतिमा पाहून त्यांना संधी मिळावी, अशी अपेक्षाही त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजपच्या या दोन्ही आमदारांत कोणाला संधी मिळणार, याकडे भाजपच्या कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. शिवसेनेने जिल्ह्यात आपली एक जागा कायम राखल्याने सेनेच्या अस्तित्वाचा झेंडा रोवल्याबद्दल आ. अनिल बाबर यांचा समावेश मंत्रिमंडळात व्हावा म्हणून त्यांच्या समर्थकांनी देव पाण्यात ठेवले आहेत. त्यांचेही नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.युतीचे तिन्ही आमदार गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत आहेत. बुधवारी रात्री उशिरापर्यंत यातील कोणालाही मंत्रिपदाबाबत कल्पना नव्हती. संभ्रमाचे वातावरण दिसत होते. जिल्ह्यातील कोणाची वर्णी मंत्रिमंडळात लागणार, याचीही कल्पना नाही. सांगली जिल्ह्यातील तिन्ही आमदारांच्या समर्थकांचे व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे डोळे आता मुंबईकडे लागले आहेत. यंदा शिवसेनेला अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वाढीव कोट्यात सांगली जिल्ह्याला लाभ मिळावा म्हणून जिल्ह्यातील शिवसैनिक प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्याला एक किंवा दोन मंत्रिपदे मिळतील, अशी चिन्हे आहेत. गत मंत्रिमंडळात कृषी राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागलेल्या रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना नव्या मंत्रिमंडळातही संधी मिळण्याची आशा आहे. त्यांच्या समर्थकांनी यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 5:58 PM
सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी ...
ठळक मुद्देकोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी? खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल