अविनाश कोळीसांगली : कोणत्याही निवडणुका जवळ आल्या की, ‘मिरज पॅटर्न’चा पत्ता बाहेर काढला जातो. स्थानिक राजकारणात सर्वपक्षीय माजी नगरसेवकांच्या या पॅटर्नचा इतका मोठा दबदबा निर्माण करताना नागरिकांच्या प्रश्नांसाठी तो का केला जात नाही, हा सवाल अस्वस्थ करणारा आहे. संपूर्ण मिरज शहर सध्या विविध समस्यांनी ग्रस्त असताना त्यासाठी कधी हा पॅटर्न वापरल्याचे येथील जनतेला ऐकिवात नाही. त्यामुळे हा ‘अर्थ’कारणाचा पॅटर्न आहे की, राजकीय स्वार्थकारणाचा हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दिवंगत माजी आमदार एन. आर. पाठक यांच्या सामाजिक व राजकीय परंपरेची पार्श्वभूमी लाभलेल्या ऐतिहासिक मिरज शहरातील राजकारण दूषित होत आहे. कोणताही पक्ष पाठीशी नसतानाही लोकांच्या पाठबळावर निवडून येता येते हे सिद्ध करणाऱ्या राजकारणाची परंपरा मिरजेचीच. आताही स्वत:च्या ताकदीवर निवडून येणारे नेते मिरजेत असले तरी फरक केवळ जनतेच्या प्रश्नांच्या लढ्याचा आहे. ताकद असूनही त्याचा वापर जनतेसाठी करण्याऐवजी तो केवळ स्वार्थी राजकारणासाठी केला जावा, हे या परंपरेला छेद देणारे आहे.पक्ष कोणताही असला तरी एखाद्याला पराभूत करण्यासाठी किंवा एखाद्याच्या विजयासाठी शक्ती खर्च करणाऱ्या नेत्यांचा हा फोरम महापालिकेच्या स्थापनेपासून गठित झाला. त्यापूर्वीही अस्तित्व असले तरी त्यात फारसा जीव नव्हता. स्थानिक पातळीपासून आता लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत या पॅटर्नचा दबदबा निर्माण झाला आहे. राजकीय गोटात त्याचा धसकाही घेतला जातो. हा दबदबा लोकांच्या कामी येत नाही, हा या संघटनेचा कमकुवत दुवा आहे.
म्हणे मिरजेत विकासकामे झालीमिरज पॅटर्नमधील माजी नगरसेवकांनी पालकमंत्र्यांना पाठिंबा देताना त्यांच्या विकासकामांचे दाखले दिले. इतकी विकासकामे झाली असतील तर मिरजेला राज्यातील सुंदर व विकसित शहराचा दर्जा मिळाला असता. असा सूर सामान्य जनतेतून उमटत आहे.
..तर निवडणुका हव्यात कशाला?भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं अशा सर्व गटातील माजी नगरसेवक, पदाधिकारी पालकमंत्र्यांना पाठिंबा देण्यासाठी एकवटले होते. असे असेल तर कोणत्याच निवडणुका न लढविता सर्व निवडणुकाच याच सर्वपक्षीय पॅटर्ननुसार बिनविरोध कराव्यात. निवडणुका हव्यातच कशाला, असा सवाल काही नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे.
एक फाइलही हलत नाहीराज्यातील अनेक आमदारांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी धडपड सुरू केली आहे. अनेकांचे प्रश्न मार्गी लागलेही. सांगली, मिरजेच्या ड्रेनेजच्या वाढीव खर्चाचा प्रस्ताव महिनाभर शासनाकडे पडून आहे; पण त्याच्या मंजुरीची तसदी सत्ताधारी आमदारांना, पॅटर्न राबविणाऱ्या माजी नगरसेवकांना घ्यावीशी वाटत नाही.
हे प्रश्न कधी दिसत नाही का?
- २४ कोटी रुपयांसाठी मिरजेची ड्रेनेज योजना रेंगाळली आहे.
- १३ कोटी रुपये खर्च करूनही मध्यवर्ती भाजी मंडई उभारणी नाही
- ७ कोटी रुपये खर्च करूनही छत्रपती शिवाजी क्रीडांगणाचा विकास नाही
- अनेक वर्षांपासून गाजलेल्या छत्रपती शिवाजी रस्त्याचे काम अपूर्ण
- शहराअंतर्गत खराब रस्त्यांचा प्रश्न अधांतरी
- मिरजेचे शासकीय रुग्णालय सुविधांपासून वंचित
- मिरज जंक्शन विकास व सुशोभीकरणाचे काम अद्याप सुरू नाही
- मिरज-सांगली रस्त्यावर कृपामयीजवळ पर्यायी पुलाचा प्रश्न अधांतरी