अविनाश कोळीसांगली : मोठी मतदारसंख्या असलेल्या सांगली विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेल्या विशाल पाटील यांना भाजपचे संजय पाटील यांच्याविरोधात तब्बल १९ हजार १९२ चे मताधिक्य मिळाले. मागील निवडणुकीतील आकडेवारीशी तुलना केल्यास संजय पाटील यांच्या म्हणजेच भाजपच्या मतांमध्ये केवळ ६ हजार ५४८ मतांची घट दिसते.याउलट विशाल पाटील यांना गत निवडणुकीच्या तुलनेत ३३ हजार ४७६ मते अधिक मिळाली आहेत. इतकीच मते वंचित बहुजन आघाडीच्या पदरात मागील वेळी पडली होती. त्यामुळे सांगलीतही वंचित फॅक्टर कामी आल्याचे दिसून येते.
सांगलीत भाजपचे आमदार असतानाही लोकसभेचे उमेदवार संजय पाटील यांना मताधिक्य मिळाले नसल्याची चर्चा रंगली असली तरी येथील भाजपच्या मतांमध्ये फार मोठी गडबड झालेली नाही. याउलट ‘वंचित’ फॅक्टरचा परिणाम दिसत आहे.
२०१९ व २०२४ ला काय घडले?
- मागील लोकसभा निवडणुकीत संजय पाटील यांना सांगली विधानसभा मतदारसंघातून ९२ हजार ५४१ मते मिळाली होती. यंदा त्यात ६ हजार ५४८ मतांची घट होऊन ८५ हजार ९९३ मते मिळाली.
- आमदार सुधीर गाडगीळ यांना गत विधानसभेला ९३ हजार ६४ मते होती.
- या मतांपेक्षा ७ हजार मते यंदा संजय पाटील यांना कमी मिळाली.
विजयाची कारणे
- पाठिंब्याचा लाभ
- विशाल पाटील यांना मागील निवडणुकीत ७१ हजार ७०९ मते होती. त्यात ३३ हजार ४७६ मतांची वाढ यंदाच्या लोकसभा निवडणुकीत झाली.
- मागील निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांना सांगली विधानसभा क्षेत्रातून ३२ हजार ७८० मते मिळाली होती.
- साधारण तेवढ्याच मतांचे दान विशाल पाटील यांच्या पदरात वाढले. यंदा वंचित बहुजन आघाडीने विशाल पाटील यांना पाठिंबाही दिला होता.
- त्यांचा फॅक्टर विशाल पाटील यांच्या कामी आल्याचे दिसत आहे.
पराभवाची कारणे
- शहराशी संपर्काचा अभाव
- सांगली विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत खासदार संजय पाटील यांच्या जनसंपर्काचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून आला.
- रेल्वे उड्डाणपूल, पाणी प्रश्नासह शहरी भागातील समस्यांकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे शहरातून त्यांच्याबद्दल नाराजी दिसत होती.
- सांगलीतील माजी नगरसेवक, पदाधिकारी यांच्याशी संपर्काचा अभाव दिसला. हे लोक प्रचारात उतरले तरी कार्यकर्त्यांत उत्साह दिसला नाही.
- भाजपच्या मित्र पक्षांतील पदाधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष करणेही त्यांच्यासाठी तोट्याचे ठरले.
जर.. तर..मागील पाच वर्षांच्या काळात सांगली शहराशी संपर्क ठेवून पक्षांतर्गत नातेसंबंध दृढ केले असते तर संजय पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळविण्यात यश आले असते.
२०२४ सांगली विधानसभा मतदारसंघविशाल पाटील - १,०५,१८५ विजेतासंजय पाटील - ८५,९९३ मताधिक्य - १९,१९२