अशोक डोंबाळे सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सांगलीला खमक्या राजकीय नेतृत्व नसल्याची पोकळी याला कारणीभूत आहे का, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दि. २६ आॅगस्टरोजी संपल्यानंतर दि. २७ रोजी लगेच प्रशासक नियुक्ती केली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांनी प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तरीही ती त्यांनी फेटाळून लावली.
या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. पण, पलूस बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपून महिना झाला तरीही तेथे प्रशासक का नियुक्त केला नाही, अशी चर्चा आहे. तेथे विश्वजित कदम गटाची सत्ता आहे. पलूस बाजार समितीत कदम यांचा शब्द मानला जातो आणि सांगली बाजार समितीत का डावलले, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.तासगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २७ आॅगस्टलाच संपली आहे. तेथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. तेथील घोटाळ्याच्या चौकशीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी तासगाव बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ देऊ नये, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. तरीही त्यांना अभय दिले आहे. सांगली बाजार समितीबरोबरच मुदत संपली असतानाही, तासगाव बाजार समितीवर प्रशासक का नियुक्त केला नाही, असा प्रश्न सांगली बाजार समितीच्या संचालकांनी उपस्थित केला आहे.इस्लामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ आॅगस्टरोजी संपली आहे. तेथेही प्रशासक नियुक्त केला नाही. तेथे जयंत पाटील गटाची सत्ता आहे. त्यांनी प्रशासक नियुक्त करताना दुजाभाव केल्याचे बोलले जात आहे.पक्षप्रवेश न केल्याची शिक्षासांगली बाजार समितीमध्ये सभापतीपद काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या गटाकडे होते. जयश्रीताई यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण, काँग्रेस नेत्यांनी नाराजी दूर केल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश थांबला आहे. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील आणि काही संचालकांनाही राष्ट्रवादीची आॅफर होती. परंतु पाटील व अन्य संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. राष्ट्रवादीत प्रवेश न झाल्यामुळेच सांगली बाजार समितीवर प्रशासक नियुक्त झाल्याचा आरोप केला जात आहे.