सांगली : शहरातील रेल्वे स्थानकासमोरील वांगीकर प्लॉट परिसरात वाद असतानाही तुझा मुलगा आमच्या घरी का आला या कारणावरून वाद घालत एका महिलेवर कात्रीने हल्ला करून तिला जखमी करण्यात आले. याप्रकरणी सीताबाई रावसाहेब आटपाडे (रा. धनवडे प्लॉट, सांगली) यांनी अजित पांडुरंग खोत (रा. नेहरूनगर,सांगली) याच्याविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या हल्ल्यात फिर्यादी आटपाडे यांची मुलगी उज्ज्वला बाळासाहेब खोत ही जखमी झाली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. ६ रोजी रात्रीसाडे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. फिर्यादी सीताबाई आटपाडे यांची मुलगी रेल्वे स्थानकासमोरील वांगीकर प्लॉट येथे राहण्यास आहे. शुक्रवारी साडेआठच्या सुमारास संशयित तिथे गेला व त्याने ‘तू आमच्याशी बोलत नाहीस, तुझा मुलगा उदय आमच्या घरी कशाला आला’ असे म्हणून त्याने वाद घातला.
यावेळी जखमी उज्ज्वला खोत या दुधाची पिशवी कात्रीने कापत होत्या. त्यांच्या हातातील कात्री घेऊन संशयिताने उज्ज्वला यांच्या गळ्याजवळ, पोटावर, हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.घटनेची माहिती मिळताच प्रभारी पोलिस उपअधीक्षक कल्लाप्पा पुजारी यांनी घटनास्थळी भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिसांनी दोन साक्षीदार तपासत पुढील तपास सुरू केला आहे.