शेतमाल विक्री व्यवस्थेमधील पारंपरिक पद्धती बंद करून संगणकीकृत आणि ऑनलाईन लिलावाद्वारे व्यवहार करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय कृषी बाजाराची संकल्पना प्रत्यक्षात आणली असून, त्यासाठी ई - नाम (इलेक्ट्राॅनिक नॅशनल ॲग्रीकल्चर मार्केट) हे एक व्यापार पोर्टल निर्माण केले आहे. या ई-नाम पोर्टलच्या माध्यमातून वसंतदादा पाटील मार्केट यार्डात गतवर्षी हळद, बेदाण्याची कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली होती. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन खरेदी - विक्रीमध्ये खरेदीदार आणि विक्रेत्यांची गर्दीही होणार नाही. यामुळे कोरोनाचा फैलावही होणार नाही. शेतकऱ्यांच्या शेतीमालाची उलाढालही सुरू होईल. सध्या बेदाण्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात झाले आहे. शेतकऱ्यांचा बेदाणा शीतगृहात पडून आहे. बेदाणा विक्री होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी बँकांसह हात उसने घेतलेल्या पैशाचे कर्ज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने बेदाण्याचे सौदे सुुरू होणे गरजेचे आहे. हळद सौद्याचीही तशीच परस्थिती आहे. परंतु, प्रशासनासह व्यापाऱ्यांकडून ई-नाम सौद्यास काहीच प्रतिसाद नाही.
चौकट
नोंदणी कशी करावी?
सर्वप्रथम वेबसाईट www.enam.gov.in वर जावे लागेल. त्यानंतर या नोंदणीसाठी अर्ज करावा लागेल. तेथे एक शेतकरी पर्याय दिसेल. मग आपला ई-मेल आयडी द्यावा लागेल. यात आपल्याला ई-मेलद्वारे लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल. यानंतर ई-मेल आयडी आणि पासवर्ड पाठविला जाईल. आपण केवायसी कागदपत्रांद्वारे www.enam.gov.in या वेबसाईटवर अर्ज करून आपल्या डॅशबोर्डवर नोंदणी करू शकता.
चौकट
व्यापारी, अडत्यांचा प्रतिसादच नाही : महेश चव्हाण
ई-नाम पोर्टल बाजार समितीने चालूच ठेवले आहे. बेदाणा, हळदीचे व्यवहार करण्यासाठी पोर्टल चांगले आहे; पण व्यापारी, अडत्यांचा काहीच प्रतिसाद नसल्यामुळे व्यवहार होत नाहीत. कोरोनामध्ये गर्दी टाळण्यासाठी ई-नाम पोर्टलचा चांगला फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.