सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षकबँकेत सत्ताधारी दोन वर्षांत कामाचा ठसा उमटविण्यात अपयशी ठरल्याने सारखेच शिळ्या कढीला ऊत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सोलापूरचे १८८ सभासद थकबाकीदार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत का दाखवत नाहीत?, असे विरोधकांना सडेतोड उत्तर शिक्षकबँकचे माजी अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी दिले. तसेच सोलापूरमध्ये तुम्ही सभासद वाढविले कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.सोलापूरच्या १८८ कर्जदारांकडे १६ कोटींचे व्याज थकीत आहे. हे थकबाकीदार शिक्षक समितीच्या कालावधीतील आहेत. यामुळे बँकेचा दोन कोटी रुपयांनी नफा कमी झाला आहे, अशी टीका शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली होती. या टीकेला प्रत्त्युत्तर देतांना यु. टी. जाधव बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्याबाहेरील सभासदांचा अनुभव वाईट असेल तर सातारा जिल्ह्यातील सभासद वाढविण्याचा खटाटोप कशासाठी करत आहे. बक्षिस व बोनस पगार बंद केला, म्हणणारांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढी देऊन नफ्याला कात्री लावली आहे. दोन लाख रुपये घेऊन पदोन्नती कशासाठी दिली? नोकरभरती बंद म्हणणाऱ्यांनी नवीन कर्मचारी का भरले? समितीच्या काळात झालेला नफा सभासदांना देण्याऐवजी इमारत व जागा खरेदीकडे का वळवला? याची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी सभासदांना देण्याची गरज आहे. सभासदांना लाभांश देताना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. याची कुणकुण लागल्याने आतापासूनच रडगाणे सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. शिवाय इतर संचालकांना नोकरभरतीच्या मानसिक गुलामगिरीत अडकवून सत्तेचा मलिदा केवळ दोघे ते तिघेच चाखत आहेत. सध्याचे सत्ताधारी संचालक मंडळ ठेवीदारांचे हित बघणारे की कर्जदार सभासदांचे शोषण करणारे आहे हेच कळत नाही. कारण ठेवीचे व्याजदर वाढविले, म्हणता मग कर्जाचे व्याजदर कमी का केले नाही? केवळ निवडून येईपर्यंत ढोल बडवले व सहा महिन्यांतच दिलेले एक अंकी कर्जव्याजदराचे आश्वासन हवेत विरले.यावेळी शिक्षक समितीचे नेते सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष सदाशिव पाटील, सचिव शशिकांत बजबळे, जिल्हाध्यक्ष माणिक पाटील, सरचिटणीस हरिभाऊ गावडे आदी उपस्थित होते.
विनायक शिंदे स्वत:च्या तालुक्यातच अपयशीथकबाकीदारांची वसुली करण्यासाठी नियोजनाचा अभाव आहे. गैरकारभार थांबवण्याऐवजी स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणे सत्ताधाऱ्यांनी बंद केले पाहिजे. पंढरपूर व उमदी नवीन शाखा काढूनही थकबाकी कमी कशी झाली नाही. उमदी शाखेत ११९ थकबाकीदार म्हणजेच बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे स्वतःच्या तालुक्यातच अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही जाधव यांनी केली.