सांगली : पाण्याअभावी कृष्णा नदी कोरडीठाक पडली असताना, पंतप्रधानांच्या दौऱ्यामध्ये गेलेल्या पालकमंत्री सुरेश खाडे यांना शुक्रवारी प्रश्नांच्या फैरींचा सामना करावा लागला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत पत्रकारांच्या प्रश्नांना तोंड देताना त्यांची पुरेवाट झाली.आठवडाभरापासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडलेले असताना साताऱ्याच्या पालकमंत्र्यांनी फक्त एक टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिले आहेत. यावर पालकमंत्र्यांना थेट खुलासा करता आला नाही. प्रश्नांच्या फैरीत ते अडकले.
पालकमंत्र्यांना निरुत्तर करणारे प्रश्न असे :
- कृष्णेत पाणी सोडण्यासाठी कालवा समितीच्या बैठकीची वाट पाहण्याची गरज होती काय?
- सातारा जिल्ह्यात कोयना धरण असल्याने तेथील पालकमंत्री शंभूराजे देसाई दादागिरी करत आहेत का?
- कृष्णेतील टंचाईप्रश्नी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची संयुक्त बैठक का घेतली नाही?
- काँग्रेस, राष्ट्रवादी रस्त्यावर आल्याने पाणी सोडावे लागले का?
- पाण्यासाठी सांगली व सातारा जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांत समन्वय आणि संवाद कमी पडतोय का?
- साताऱ्याचे पालकमंत्री धरण आपल्या मालकीचे असल्याप्रमाणे का वागताहेत?