सांगली : सांगलीत कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाला पर्याय म्हणून उभारण्यात येणाऱ्या समांतर पुलाचा मुद्दा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठेचा बनला आहे. त्याऐवजी शहराची गरज, भविष्यातील बाजारपेठ आणि वाहतुकीचे नियोजन, दळणवळणाचा प्राधान्यक्रम आणि व्यवहार्य मार्गाची सांगड घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो. मात्र गरज आहे, केवळ राजकीय इच्छाशक्तीची!
आयर्विन पुलाचा पर्यायी पूल आता काहींनी प्रतिष्ठेचा प्रश्न बनविला आहे. या पुलाची मंजुरी आणणारे भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये दररोज वाक्युद्ध सुरू आहे. आ. गाडगीळ यांच्या गटाच्या म्हणण्यानुसार समांतर पूल झालाच पाहिजे आणि ‘आयर्विन’पासून ४७ मीटरवरील या पुलाला कापडपेठेचा जोडरस्ता द्यायचा नसेल, तर पुलाच्या मार्गावरील पांजरपोळवरून येणारी वाहतूक उजवीकडे टिळक चौकाकडे वळवून हरभट रस्त्यावरून आणि डावीकडे गणपती मंदिराकडे वळवून गणपती पेठेतून न्यावी. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि व्यापारी याविरोधात आहेत. या पुलावरून येणारी वाहतूक नव्वद अंशामध्ये वळवणे तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नसल्याने ती सरळ पुढे कापडपेठेतून न्यावी लागणार असल्याची भीती ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे कापडपेठेतील रस्ता रूंद करावा लागेल, त्यात व्यापाऱ्यांची दुकाने जातील, असा त्यांचा दावा आहे. महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी रस्त्याच्या रूंदीकरणाची हमी दिल्यानेच सार्वजिनक बांधकाम विभागाने या आराखड्यास मंजुरी दिल्याचे समोर आले आहे. यातील धोका दिसू लागल्यानेच या आराखड्यास विरोध सुरू आहे.
चौकट
वाहतुकीच्या कोंडीत भर कशाला?
गणपती पेठेत सकाळी नऊपासून रात्री आठपर्यंत मालवाहू वाहनांची गर्दी असते. यावेळेत वाहतुकीची कोंडी ठरलेलीच. त्यामुळे तिकडून वाहतूक वळवणे सोयीस्कर ठरणार नाही. पुलावरून येणारी वाहने उजवीकडे टिळक चौकाकडे नव्वद अंशात वळवणेही तांत्रिकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. अवजड वाहतूक बायपासमार्गे गेली, तरी पांजरपोळमार्गे येणाऱ्या पर्यायी पुलावरील बसेस आणि मालवाहतुकीचे टेम्पो-रिक्षा वळवणे जिकिरीचे ठरेल.
चौकट
पर्यायी पुलावरील वाहतूक बायपासमार्गे
सांगली शहराचा विस्तार आता पूर्वेकडे आणि दक्षिणोत्तर वेगाने होत आहे. त्यामुळे बाजारपेठेचेही विकेंद्रीकरण अनिवार्य ठरते. पश्चिमेकडे वाढण्यासाठी वाव नाही. त्यामुळे शहरात येणारी आणि शहराबाहेर जाणारी वाहतूक त्याच दिशांनी विभागली जाणे क्रमप्राप्त ठरते. ती पश्चिमेकडून येऊन बाजारपेठेतील कोंडीला कारणीभूत ठरू नये, यासाठी सध्याच्या बायपासचे रूंदीकरण होऊन त्याचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळे ‘आयर्विन’च्या पर्यायी पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांसह अधिकाधिक वाहतूक तिकडे वळवता येईल.
चौकट
नव्या रिंगरोडमुळे पर्यायी पुलाची गरज कमी
विकास आराखड्यानुसार सांगलीला रिंगरोड मंजूर झाला आहे. सांगलीवाडीच्या टोलनाक्यापासून हरिपूरच्या लिंगायत स्मशानभूमीपर्यंत कृष्णेवर नवा पूल होत आहे. त्याला जोडणारा मार्ग कोल्हापूर रस्ता-शंभरफुटी रस्त्यापर्यंत येणार आहे. हा नवा रिंगरोड असेल. बसस्थानक परिसर, शहराचा दक्षिण भाग आणि कोल्हापूर-मिरजेकडून येऊन सांगलीच्या पश्चिमेकडे जाणारी-येणारी वाहने त्या मार्गाने जातील. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहतुकीवरील ताण कमी होईल. पर्यायाने ‘आयर्विन’च्या पर्यायी पुलाची गरज कमी होईल.
चौकट
दहा मीटरवर होणारा पूलच योग्य
सांगलीवाडी आणि पश्चिम भागातून येणारी दुचाकी आणि हलक्या वाहनांसाठी सध्या तरी ‘आयर्विन’पासून दहा मीटरवर होणारा पूलच योग्य ठरतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या मूळ आराखड्यानुसार तो थेट टिळक चौकात येईल. त्यामुळे व्यापारी पेठेवरील गंडांतर टळेल. भूसंपादन, रस्ता रूंदीकरण आणि सांगलीवाडीच्या मैदानाचे नुकसानही टाळता येईल. यासाठी पुलाचा प्रश्न प्रतिष्ठेचा करणाऱ्यांनी दोन पावले मागे येण्याची गरज आहे.
चौकट
आठवडाभरात बैठक
पुलाच्या प्रश्नामध्ये पालकमंत्री जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. विकास आराखड्यानुसार होणारा रिंगरोड त्यांनीच मंजूर करून आणला आहे. आता पर्यायी पुलाचे त्रांगडे सोडविण्यासाठी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाशी चर्चा केली आहे. आठवडाभरात आ. सुधीर गाडगीळ यांच्याशीही बोलून मार्ग काढण्यासाठी हालचाली सुरू आहेत.