सांगली : कोरोनातून बरे झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर शरीरात कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटिबॉडी) तयार झाले आहेत का, याची तपासणी अनेक लोकांकडून केली जात असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. विविध लॅबमध्ये दिवसाला सुमारे १० ते १५ जण अशा प्रकारे तपासणी करीत असल्याची माहिती आहे. या प्रकारामुळे त्यांच्या सार्वजनिक ठिकाणी वावरण्यात बिनधास्तपणा दिसून येत आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यास अँटिबॉडीज तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात अँटिबॉडीज तयार होतात, हे एक प्रकारचे कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात कायम आहे. याशिवाय तिसरी लाट तोंडावर आहे. अशा परिस्थितीत ज्यांना कोरोना आजपर्यंत झालेला नाही, अशा व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना नकळत होऊन गेलेला नाही ना, या शंकेने अँटिबॉडीजची तपासणी केली जात आहे. शहरातील खासगी पॅथॉलॉजीमध्ये मागील काही दिवसांपासून अशा प्रकारच्या तपासणीसाठी नागरिकांचा कल दिसून येत आहे. प्रत्येक नागरिकाने अशा प्रकारची चाचणी करण्याची काहीच आवश्यकता नसते. लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
जिल्ह्यात लसीकरण पहिला डोस - ७,५२,१७८
दुसरा डोस - २,७०,४३१
लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण - ३३ टक्के
अँटिबॉडीज तपासणीच्या प्रमाणात वाढ
शहरात अँटिबॉडीज तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील एका खासगी पॅथॉलॉजीशी संपर्क साधला असता, काही लोक उत्सुकता म्हणून अँटिबाॅडीज तपासणीसाठी येत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे आठवड्याला १४ ते १५ लोकांची तपासणी होत आहे.
तरुणाईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता
लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांत शरीरातील अँटिबॉडीज वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काहीजण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही समावेश आहे. लसीकरणानंतर संसर्ग झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बाेलताना सांगितले.
कोट
लसीकरणानंतर अँटिबॉडीज तपासणी करण्याची काहीही गरज नाही. त्या आपोआप तयार होत असतात. लसीकरण केले किंवा कोरोनातून बरे झाल्यानंतर अँटिबॉडिज तयार होतात, म्हणून नियमांकडे दुर्लक्ष करू नये. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व अन्य नियमांचे पालन आवश्यक आहे.
- डॉ. संजय साळुंखे, जिल्हा शल्यचिकित्सक