तासगाव : तासगाव, कवठेमहांकाळ मतदारसंघात सध्या अविश्वासाचे राजकारण सुरू झाले आहे. पैशातून मते हा फंडा जोरात पसरला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांची अवस्था स्टेशनवरल्या हमालासारखी झाली असल्याचे मत माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केले.सावर्डे (ता. तासगाव) येथे पाणीपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. विकास सोसायटीने पाणीपट्टी भरून शेतकऱ्यांसाठी पाण्याची सोय करून दिली आहे. त्याचे पूजन घोरपडे आणि माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे साहेबराव पाटील, शिवसेनेचे प्रदीप माने, काँग्रेसचे महादेव पाटील, दिलीप पाटील, पांडुरंग पाटील, आर. डी. पाटील, स्वप्नील पाटील आदी उपस्थित होते.यावेळी घोरपडे म्हणाले, लोकांना पैसे देऊनही मतदान होत नसेल तर त्यांना नेमके काय पाहिजे याचा विचार करावा लागेल. विकासाचे राजकारण करणारी माणसे उद्ध्वस्त झाली आहेत. पुढाऱ्यांची वागण्याची पद्धत जनतेने एकदा पाहावी. मी आमदार असताना घरबशा झालो नव्हतो. अनेक योजना राबविल्या, विकासाचे राजकारण केले; पण आता बदललेल्या राजकारणाने मला पुन्हा राजकारणात पडायची इच्छा राहिलेली नाही.
पृथ्वीराज देशमुख म्हणाले, संपतराव देशमुख व घोरपडे यांच्या प्रयत्नातून कृष्णा खोरे महामंडळ स्थापन झाले. जिल्हा हिरवागार झाला; पण नव्या पिढीला याची माहिती नाही. आम्ही केले म्हणून छाती बडवत बसलो नाही. लोकांच्या त्यागामुळे पाणी आले. जिल्ह्यात कोण काय बोलते याकडे आम्ही लक्ष देत नाही. सत्तेच्या मागे कधीच लागलो नाही. विकास आणि पाण्याचे राजकारण केले. स्वप्नील पाटील यांनी सोसायटीमार्फत १३ लाख रुपये दिल्याने गाव पाणीदार होणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र पाटील यांनी स्वागत केले.