अनैतिक संबंधातून नागाव कवठे (ता. तासगाव) हद्दीत अभिजित सुधाकर नवपुते (वय ३५ रा. औरंगाबाद) यांचा खून झाला होता. याप्रकरणी प्रशांत अशोक पाटील (वय ३७ रा. कुमठे) याला पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. शुक्रवारी पोलिसांनी मृत सातपुते यांची पत्नी निकिता सातपुते हिला अटक केली असून दोघांनाही न्यायालयाने १७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेले अभिजित नवपुते हे वीज महावितरणकडे वायरमन म्हणून कुमठे येथे कार्यरत होते. यातून संशयित आणि अभिजित याची ओळख झाली होती. संशयित प्रशांत आणि अभिजित यांच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. याची कुणकुण अभिजित यांना लागली होती. यावरून अभिजित आणि प्रशांत यांच्यात खटके उडाले होते. रविवार दि, ९ मे रोजी प्रशांत याने अभिजित यांना सकाळी अकरा वाजता तासगाव-सांगली रस्त्यावरील बंद अवस्थेत असणाऱ्या हनुमान पेट्रोल पंपावर बोलावून घेतले.
त्याठिकाणी प्रशांत याने अभिजित याला दारुतून जबरदस्तीने विषारी औषधाची गोळी देऊन त्यांचा खून केला. खून केल्यानंतर प्रशांत याने अभिजीतचा मृतदेह पेट्रोल पंपाशेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहात टाकून दिला. मृतदेहावर शेजारील शेतातील माती टाकून मृतदेह कुजवण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा पश्चाताप झाल्याने गुरुवारी सकाळी तो पोलिसात स्वतःहून हजर झाला होता. अधिक चौकशी करून पोलिसांनी मृत सातपुते यांची पत्नी निकिता हिला अटक केली. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत.