- शरद जाधव सांगली- शहरातील वानलेसवाडी येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यावर चाकूने वार करत खून करणाऱ्या संशयितास पोलिसांनी विजयपूर (कर्नाटक) येथून जेरबंद केले. शिल्पा सदाप्पा कटीमणी (वय २५, रा. कक्केरी, जि. यातगिरी, कर्नाटक) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, संशयित पती सिदाप्पा नागाप्पा कटीमणी (वय ३०, रा. कक्केरी, जि. यातगिरी, कर्नाटक) हा खुनानंतर पसार झाला होता. विश्रामबाग पोलिसांनी तपास करत त्याला अटक केली.
गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी मृत शिल्पा यांच्या आई मंजुळा ऊर्फ लक्ष्मीबाई शिवरुद्र दोड्डमणी ( रा. मूळ तळवारगीर, कर्नाटक, सध्या वानलेसवाडी, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.
कर्नाटकातील कक्केरी येथील सिदाप्पा कटीमणी याच्यासोबत शिल्पाचा विवाह झाला. मात्र, सिदाप्पा हा वारंवार तिच्यावर संशय घेत मारहाण करीत होता. याला कंटाळून शिल्पा वानलेसवाडी येथे माहेरी आईजवळ आल्या होत्या. गुरुवारी रात्री संशयित सिदाप्पा येथे आला व त्याने शिल्पाला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली व चाकूने वार केले. यातच शिल्पाचा मृत्यू झाला. यानंतर संशयित तेथून पसार झाला. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने विजयपूर येथे जात संशयिताला ताब्यात घेतले.