जत : अमृतवाडी (ता. जत) येथे गुरुवारी घरातून शेतमजुरीची लहान मुलगी व मुलगा बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. सुलोचना आनंद गवळी (वय ४) व इंद्रजित आनंद गवळी (३) अशी बेपत्ता मुलांची नावे आहेत. जत पोलिस व स्थानिक नागरिकांनी गुरुवार व शुक्रवारी त्यांचा शोध घेऊनही ती सापडली नाहीत. याबाबत आनंदा गवळी (वय ३५, मूळ गाव सुरगाना, जि. नाशिक, सध्या रा. अमृतवाडी) यांनी जत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.जत येथील द्राक्ष बागायतदार दीपक हत्ती यांच्या शेतात आनंद गवळी हे तीन वर्षांपासून मजूर म्हणून काम करत आहेत. ते या ठिकाणी पत्नी व दोन मुलांसह राहतात. गुरुवारी आनंद यांची पत्नी आजारी असल्याने तिला रुग्णालयात दाखल केले होते. यामुळे सुलोचना व इंद्रजित ही त्यांची दोन मुले घरीच होती. गुरुवारी सायंकाळी आनंद गवळी हे घरी आले. त्यावेळी मुले घरात दिसली नाहीत. त्यांची परिसरात त्यांचा शोध घेतला; पण ती सापडली नाहीत; यामुळे गवळी यांनी जत पोलिस ठाण्यात याबाबत गुरुवारी रात्रीच फिर्याद दिली होती.शुक्रवारी सकाळी पोलिसांनी माहिती घेतली. परिसरात शोध सुरू केला. संशय आल्याने घरानजीक असणाऱ्या विहीर व शेततळ्यातील पाण्याचाही उपसा केला; पण हाती काहीच लागले नाही. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर पोलिस निरीक्षक राजेश रामाघरे व पोलिस पथक अमृतवाडी गावात तळ ठोकून होते.
पत्नी रुग्णालयात, अन् घरातून शेतमजुराची मुले बेपत्ता; सांगलीतील अमृतवाडीत उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 1:08 PM