शिराळा : बेलदारवाडी (ता. शिराळा) येथे चारित्र्याच्या संशयावरून स्वाती प्रकाश शेवाळे (वय २६, मूळ गाव बेलदारवाडी, सध्या रा. कऱ्हाड) यांचा पती प्रकाश आनंदा शेवाळे (३५) याने गळा आवळून खून केला. घटनेनंतर हल्लेखाेर प्रकाश फरार झाला आहे. गुरुवारी रात्री घडलेली ही घटना शुक्रवारी सकाळी अकराला उघडकीस आली.मृत स्वाती पती प्रकाश, मुलगा अथर्व (वय ४), मुलगी आराध्या (वय २) यांच्यासह कऱ्हाड येथे राहात हाेत्या. प्रकाश कऱ्हाड परिसरात मोलमजुरी करताे. दोघांनी प्रेमविवाह केला होता. प्रकाशचे वडील आनंदा शेवाळे दोन महिन्यांपासून आजारी आहेत. प्रकृती बिघडल्याने त्यांना कोल्हापूरच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. यामुळे प्रकाश व स्वाती कऱ्हाडहून त्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांना रुग्णालयातून साेडल्यानंतर रात्री स्वाती, प्रकाश त्याचे वडील आनंदा, आई रंजना हे चौघेही कोल्हापूरहून बेलदारवाडी येथे आले. रात्री दहा वाजता चौघांनी एकत्र जेवण केले. यानंतर प्रकाशचे आई-वडील शेजारी चुलत्यांच्या घरी झोपायला गेले तर, प्रकाश व स्वाती घरात झोपले होते.सकाळी आठच्या दरम्यान प्रकाशची आई जनावरांना चारा घालण्यासाठी गेली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद हाेता. अकरा वाजता शेतातून परत आल्यावर दरवाजा बंदच हाेता. तिने घरात जाऊन पाहिले असता स्वाती निपचित पडल्याचे दिसले, तर प्रकाश गायब हाेता. त्यांनी याबाबत शेजाऱ्यांना सांगितले. पोलीस पाटील योगेश मस्कर यांनी शिराळा पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता स्वाती मृतावस्थेत पडल्याचे दिसले.तिच्याजवळ प्रकाशने लिहून ठेवलेली चिठ्ठी मिळाली. यामध्ये ‘स्वातीचा मी गळा दाबून खून केला आहे, दोन मुले सासुरवाडीला पत्नीच्या आईकडे आहेत. याबाबत कोणालाही दोषी धरू नये,’ असे लिहिलेले आहे. सकाळी सहाच्या सुमारस प्रकाशला काही नागरिकांनी गावाबाहेर जाताना पाहिले होते.चिठ्ठीतील मजकूर पाहून पोलिसांनी प्रकाशचा शोध घेतला. मात्र तो सापडला नाही. याबाबत स्वाती यांची आई वत्सला हणमंत चव्हाण (रा. मलकापूर, कऱ्हाड, मूळगाव गुंजेवाडी, जि. उस्मानाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
हल्लेखोराच्या भावाची दोन वर्षांपूर्वी आत्महत्यासंशयित प्रकाशचा लहान भाऊ लहान विकास आनंद शेवाळे याने दोन वर्षांपूर्वी याच घरात जेथे खून झाला त्याच ठिकाणी दिवाळीत व्हिडीओ कॉल करत गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
सकाळी ६ वाजता प्रकाश पळाला‘गळा दाबून मी खून केला आहे, मुले सासुरवाडीला आईकडे आहेत. याबाबत कोणालाही दोषी धरू नये, अशी प्रकाशने लिहिलेली चिठ्ठी घटनास्थळी आढळून आली, तसेच सकाळी ६ च्या सुमारस संशयित प्रकाशला काही नागरिकांनी गावाबाहेर जाताना पाहिले होते.