कडेगाव : गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे ओगलेवाडी ते अमरापूर दरम्यान झालेले काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या निकृष्ट कामाच्या निषेधार्थ येत्या १८ फेब्रुवारी रोजी कडेगाव येथील बसस्थानक चौकामध्ये साखळी स्वरुपात अनोख्या पद्धतीने झोपून आंदोलन करण्याचा इशारा पाणी संघर्ष समितीचे प्रमुख आणि सामाजिक कार्यकर्ते डी. एस. देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला आहे.
पाणी संघर्ष समितीकडून कडेगाव येथे प्रांताधिकारी गणेश मरकड व तहसीलदार डॉ. शैलजा पाटील यांना याविषयीचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, गुहागर - विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील कडेगाव, कडेपूर, अमरापूर, हणमंतवडिये येथील पुलांची कामे गेली दोन वर्षे झाली अर्धवट अवस्थेत रखडलेली आहेत. त्यामुळे पर्यायी कच्च्या रस्त्यावरून वाहतूक होत आहे. महामार्गावरील चढ-उतार काढलेले नसल्याने व रस्ता निकृष्ट दर्जाचा बनल्याने अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत. कडेगाव बसस्थानक परिसरात ठेकेदाराने राष्ट्रीय महामार्गाचे कामासाठी एका बाजूने खोदाई केली आहे. हे काम संथगतीने सुरू आहे. तसेच रस्त्याचे काम दर्जेदार होण्यासाठी गरजेच्या असलेल्या मशिनरी न वापरताच काम सुरू आहे. या मार्गावरील काम रखडल्याने सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे.
या निवेदनावर पाणी संघर्ष समितीचे प्रमुख डी. एस. देशमुख, केमिस्ट असोसिएशनचे नेते, सामाजिक कार्यकर्ते अभिमन्यू वरुडे, आनंदराव रासकर, विजय गायकवाड, युवा नेते संतोष डांगे, अनिल देसाई, रघुनाथ गायकवाड, शशिकांत रासकर, विठ्ठल खाडे, आदींच्या सह्या आहेत.
फोटो ; कडेगाव येथे प्रांताधिकारी गणेश मरकड यांना डी. एस. देशमुख यांच्यासह पाणी संघर्ष समितीचे कार्यकर्ते यांनी निवेदन दिले.