सांगली : देशातील एकूण मताच्या ३४ टक्केपर्यंत मतदार भाजपकडे आहे. उर्वरित ६६ टक्के मतदारांचे विभाजन टाळण्यासाठी इंडिया आघाडीचे प्रयत्न असून त्यासाठीच ४५० जागांवर तुल्यबळ आणि एकास एक उमेदवार देण्यावर भर असणार आहे. कोणत्याही परिस्थितीत देशात सत्तांतर करण्याचा निश्चय करून इंडिया आघाडीतील २८ पक्ष कामाला जागले आहेत, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले, निवडणुकीचे गणित साधे आहे. २०१४ मध्ये भाजपला ३१ टक्के तर २०१९ मध्ये ३७ टक्के मतदान झाले होते. बालकोट प्रकरणामुळे २०१९ ला मते वाढली होती. आता तसे वातावरण नाही. राम मंदिराच्या बाबतीत राजीव गांधी यांनीच प्रथम मंदिराचे दरवाजे उघडले होते. मात्र न्यायालयाकडून ज्यांना जमीन मिळेल, त्यांना समर्थन काँग्रेस करेल, अशी भूमिका होती, तीच आहे.
सध्या खासगी ट्रस्टच्या माध्यमातून मंदिर उभा राहत असून त्याचा आम्हाला आनंद आहे; पण निवडणुकीत रोजगार, महागाई, भ्रष्टाचाराचे प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी ठरल्यामुळे त्यांची मते ३४ टक्केच असणार आहेत. उर्वरित सर्व घटक पक्षांना एकत्रित करून ६६ टक्के मते खचून एकास एक तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी धोरण निश्चित केले आहे.महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आमचेच आहेत; पण, अन्य छोट्या-मोठ्या पक्षांनाही बरोबर घेतले आहे. वंचित, स्वाभिमानी शेतकरी संघटनाही इंडिया आघाडीबरोबरच असणार असून त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील व शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील उपस्थित होते.
मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास लोकशाही संपेलभाजपने मागील दोन लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिलेली आश्वासन पाळले नाहीत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी वाढल्या आहेत. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जनाधार घटला आहे. यातूनही ते पुन्हा सत्तेवर आल्यास देशाची लोकशाही धोक्यात येईल. रशियात पुतीनने केले, चीनमध्ये सद्या जे चालले आहे, तेच भारतात होईल की काय अशी भीती वाटू लागलीय, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण म्हणतात..
- सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला असून तो तसाच राहिल. मागील लोकसभा निवडणुकीची चूक आता होणार नाही.
- ईडीच्या माध्यमातून दहशत, धमक्या देण्याचा प्रयत्न
- मराठा आंदोलकांना सरकारने योग्य वागणूक द्यावी
- ओबीसी विरुद्ध मराठा भांडणे लावण्याचे काम सध्या सुरू
- ईव्हीएम यंत्राबाबत मतदारांना शंका असल्यामुळे बऱ्याच देशांनी नाकारले आहे.
- प्रामाणिकपणे लढणार असाल, तर वंचितने इंडिया आघाडीशी चर्चा करावी.