फोटो ओळी : शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहनांसाठी पार्किंगच्या जागेची पाहणी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केली. यावेळी उपायुक्त राहुल रोकडे, शेखर माने, सहदेव कावडे, पराग कोडगुले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील मुख्य बाजारपेठेत होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. बाजारपेठेतील तीन जागांवर वाहनतळ विकसित केले जाणार असल्याची माहिती महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी दिली.
शहरातील वाहतूक कोंडीबाबत महापौर सूर्यवंशी यांच्या दालनात बैठक झाली. त्यानंतर उपायुक्त राहुल रोकडे, माजी नगरसेवक शेखर माने, सहाय्यक आयुक्त पराग कोडगुले, सहदेव कावडे, बाजार समितीचे वरिष्ठ लिपीक शेखर पाटील, कनिष्ठ अभियंता ऋतुराज यादव, एन. एम. हुल्लाळकर आदिंनी पार्किंगच्या जागांची पाहणी केली. महापौर सूर्यवंशी म्हणाले की, मुख्य बाजारपेठेमध्ये येणाऱ्या ग्राहक व व्यापाऱ्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सोय करण्यात येणार आहे. त्यासाठी बाजार समिती व महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीत वाहतूक कोंडीवर चर्चा झाली. आनंद चित्र मंदिर व जयश्री टाॅकीजजवळच्या खुल्या जागेत पार्किंगसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. तसेच टिळक चौकातील जनावर बाजाराच्या खुल्या जागेमध्ये वाहनतळ विकसित करण्यात येणार आहे. या वाहनतळावर स्वच्छता गृह व काँक्रीटीकरण करण्यात येईल. त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद यंदाच्या अंदाजपत्रकात करणार आहोत. या वाहनतळावर सर्व सोयी सुविधा पुरविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असेही सूर्यवंशी म्हणाले.
चौकट
वाहनतळ तातडीने विकसित करावे : भारती दिगडे
भावे नाट्य मंदिरासमोरील महापालिकेच्या खुल्या जागेत वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था होती. पण, त्यानंतर असुविधांमुळे नागरिकांनी तिथे वाहने पार्किंग बंद केली. सध्या या जागेवर उकिरडा झाला आहे. या जागेत पार्किंगसाठी आवश्यक त्या सुविधा द्याव्यात, अशी मागणी वारंवार प्रशासनाकडे केली होती. आता महापौर व उपायुक्तांनी जागेची पाहणी करून वाहनतळ विकसित करण्याची घोषणा केली आहे. हे काम तातडीने व्हावे, अशी अपेक्षा नगरसेविका भारती दिगडे यांनी व्यक्त केली.
चौकट
शनिवारच्या बाजाराचे स्थलांतर?
मुख्य बाजारपेठेत दर शनिवारी आठवडा बाजार भरतो. रस्त्यावरच बाजार भरत असल्याने मेनरोड, कापडपेठ, हरभट रोड, सराफ कट्टा, मारुती रोड या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे हा आठवडा बाजार स्थलांतरीत करण्याची मागणी होत आहे. हा बाजार टिळक चौकातील जनावरांच्या बाजाराच्या जागेवर हलविण्याच्या हालचालीही सुरू आहेत.