इस्लामपूर : आम्ही बँकांची कर्जे काढून विहिरी खोदल्या़ मात्र २-३ वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने आमचे झालेले नुकसान महावितरण कंपनी भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आपण काहीजणांनी ग्राहक पंचायतीकडे अर्ज करा, बघू या काय होते,’ असा सल्ला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील ‘ऊर्जा मित्र’ बैठकीमध्ये दिला़ आ़ पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ महावितरणचे कार्यकारी अधिकारी उस्मान शेख, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, वैभव गोंदील, विक्रांत सपाटे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली़ आ़ पाटील म्हणाले की, ज्यांनी शेतीपंपासाठी एप्रिल २0१२ ते मार्च २0१३ दरम्यान पैसे भरले आहेत, अशा ३३५ ग्राहकांची यादी केली असून त्यांची कामे सध्या सुरू आहेत़ या कामांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जुन्या, लोंबणाऱ्या, घरांवरून जाणाऱ्या तारा बदलणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे आदी कामांचे १६८0 प्रस्ताव तयार केले असून, केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील़ रेठरेहरणाक्ष गावात ट्रान्स्फॉर्मरला जागा मिळत नसल्याने पुढच्या आठवड्यात गावात आल्यावर भेट देऊ.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, रेठरेहरणाक्षचे सरपंच जे़ डी़ मोरे, बहेचे सरपंच सुधीर रोकडे, येडेमच्छिंद्रचे संग्राम पाटील, साखराळेचे सुनील पाटील, बावचीचे अनिल शिंगारे यांनी गावाचे प्रश्न मांडले. पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती भाग्यश्री शिंदे, पं़ स़ सदस्य जयकर पाटील, सुभाष पाटील यांनी स्वागत केले़. विनायकअण्णा पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, पं़ स़ सदस्य नंदकुमार पाटील, सौ़ राजेश्वरी पाटील, सौ़ रेखा कोळेकर, सौ़ शोभा देसावळे, सौ. जयश्री कदम, सुनील पोळ, पप्पू शेळके, प्रदीप थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)कनेक्शन्स नावावर करून देण्याची मागणीकर्ज काढून विहीर, कूपनलिका खोदल्याची कैफियत धोंडिराम भक्ते, राजेंद्र पाटील, मोहन पाटील यांनी मांडली़ येवलेवाडीचे पोपट जगताप यांनी, आजोबा-वडिलांच्या नावावरील कनेक्शन्स कागदपत्रांची पाहणी करून नावावर करून द्यावीत, अशी मागणी केली़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.जयंत पाटील यांनीही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना दिली.
नुकसान वीज कंपनी भरून देणार का?
By admin | Published: July 07, 2015 11:30 PM