तासगाव : एसटी महामंडळाच्या सांगली, सातारा आणि कोल्हापूर विभागातील काही लिपिकांना अतिरिक्त ठरवून विभागाबाहेर बदली आणि सेवा खंडितची कारवाई केली आहे. या लिपिकांवरील अन्याय लवकरच दूर करू, असे आश्वासन परिवनहमंत्री अनिल परब यांनी दिले.
एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी तिन्ही जिल्ह्यांतील अन्यायग्रस्त लिपिकांच्या शिष्टमंडळाने परिवहन मंत्र्यांना निवेदन देत, अतिरिक्त ठरवलेल्या लिपिकांना तातडीने मूळ ठिकाणी रुजू करून घेण्याची मागणी केली.
एसटी महामंडळाच्या अतिरिक्त लिपिकांच्या प्रश्नासंदर्भात एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी आणि अतिरिक्त लिपिकांनी मुंबई येथे परिवहन मंत्र्यांची भेट घेतली. सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी, सांगली, सातारा व कोल्हापूर वगळता इतर कोणत्याही विभागात असा प्रकार घडलेला नसताना, फक्त या तीनच विभागांमध्ये हा प्रकार घडल्याचे व ऐन कोरोना संसर्ग राज्यात थैमान घालत होता, त्याचवेळी या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केल्यामुळे माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना या तीन विभागांमध्ये घडल्याचे परिवहनमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन लवकरच न्याय देण्याचे यावेळी परिवहनमंत्र्यांनी मान्य केले.
यावेळी राजेंद्र मोजाड, निवासी सचिव नारायण उत्तेकर, स्मिता पत्की, रवींद्र चिपळूण, प्रमोद मिस्त्री, सुहास जंगम यांच्यासह अन्यायग्रस्त कर्मचारी उपस्थित होते.
फोटो-२५तासगाव१
फोटो :
सांगली, सातारा, कोल्हापूर विभागातील अन्यायग्रस्त लिपिकांना मूळ ठिकाणी सेवेत घेण्याबाबत परिवनहमंत्री अनिल परब यांना मुंंबई येथे शिष्टमंडळामार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर, नारायण उत्तेकर, स्मिता पत्की, रवींद्र चिपळूण यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.