सांगली : लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे वचन दिले होते, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी येथे दिले.येथील दैवज्ञ भवनमध्ये शिवसेनेचा महिला मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी संपर्कप्रमुख सुनिता मोरे, जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे, संजय विभुते, ज्योती दांडेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.उपसभापती गोऱ्हे म्हणाल्या, प्रतिकूल परिस्थितीत शिवसेनेने अनेक आंदोलने केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन पर्व सुरू केले. या शिवसेनेला शिंदे गट न म्हणता शिवसेना म्हणले पाहिजे. निवडणूक आयोगाने आपल्याला चिन्ह आणि नाव दिले आहे. सांगलीत पुराच्या काळात एकनाथ शिंदे मदतीसाठी धावून आले होते. राज्यातील लाडक्या बहिणींना आणखी काही योजनांचा फायदा देता येईल काय? याची आखणी केली जात आहे. २१०० रुपये देण्याचे वचन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. विरोधकांना मात्र याचा राग आहे. आज आपल्यासाठी रस्ते जसे महत्त्वाचे आहेत, तेवढाच महिलांचा संसारही महत्त्वाचा आहे.त्या पुढे म्हणाल्या, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ सेवा तक्रार प्राधिकरणकडे पाठपुरावा करून जी मुले वृद्धांचा सांभाळ करत नाहीत, त्यांना मदत करावी. बँकांमध्ये लाडक्या बहिणींना सन्मान मिळाला पाहिजे. ज्या बँका नीट वागणूक देत नाहीत, त्यांचा आढावा घेणार आहे. शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ज्या बँका सहकार्य करत नाहीत, त्यांची माहिती मला द्यावी.महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून द्या. सभासद मोहीम राबवा. जिल्हा परिषद गट व गण यामध्ये सर्वांना पदे द्या. महिलांच्या आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घ्या. यावेळी जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे, बजरंग पाटील, रावसाहेब घेवारे यांची भाषणे झाली. सुनिता मोरे यांनी स्वागत केले.
शिवसेनेचा महापौर व्हावामाजी जिल्हाप्रमुख रावसाहेब घेवारे म्हणाले, मी ५५ वर्षे शिवसेनेत आहे. एकेकाळी मुंबईनंतर सांगलीची शिवसेना अग्रेसर होती. पुन्हा ते दिवस आले पाहिजेत. सांगलीत शिवसेेनेचा महापौर झाला पाहिजे. मुंबईबरोबर पुन्हा सांगलीचे नाव आले पाहिजे.