सांगली : व्हॉटसॲप आणि फेसबुकवरुन प्रसारीत केल्या जाणाऱ्या हवामान अंदाजांवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन द्राक्ष बागायतदार संघाने केले आहे. स्वयंघोषित हवामानतज्ज्ञांनीही भावनेच्या भरात विसंगत अंदाज देऊ नयेत असेही आवाहन केले आहे.संघाचे सांगली विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, सचिव प्रफुल्ल पाटील, संशोधन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, समाजमाध्यमांतून सातत्याने पसरणाऱ्या वेगवेगळ्या अंदाजांमुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण होत आहे. याचा प्रतिकूल परिणाम बाजारपेठेवर होण्याची भिती आहे. गेल्या तीन वर्षांत नैसर्गिक संकटे व चांगल्या बाजारभावाअभावी शेतकरी अडचणीत आहे.अशावेळी तथाकथित हवामानतज्ज्ञांकडून मान्सून व एकूण पावसाच्या स्थितीविषयी चुकीची व विसंगत माहिती दिली जात आहे. सध्या बागेत छाटणीचा हंगाम सुरु आहे. अशावेळी पुढील चार महिने पाऊस पडणार असल्याच्या निराधार अंदाजाने शेतकरी संभ्रमात आहेत.जागतिक तापमानवाढीचा परिणाम हवामानावर निश्चितपणे झाला आहे, पण मान्सून चार महिने पुढे जाणे हा अंदाज चुकीचा आहे. शेतकऱ्यांनी नियोजनानुसार बागेतील कामे पूर्ण करावीत. राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राकडून पुढील आठ दिवसांचा अंदाज देण्यास लवकरच सुरुवात करणार आहोत.भावनेच्या भरात विसंगत अंदाज नकोतद्राक्षबागायतदार संघाने आवाहन केले की, राज्यातील सर्व हवामान तज्ज्ञांनी भावनेच्या भरात विसंगत हवामान अंदाज वर्तवू नयेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होते. कमी वेळेत जास्त बागांची छाटणी झाल्याने बाजारभावात अस्थिरता निर्माण होते. यात शेतकऱ्यांचे नुकसान होते. शेतकऱ्यांनीही समाजमाध्यमांवरील अंदाजांविषयी भिती बाळगू नये. ऑक्टोबर छाटण्या नियमित वेळेत घ्याव्यात. द्राक्षबागायतदार संघ शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनासाठी पाठीशी राहील.
पुढील चार महिने पाऊस पडणार? द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम
By संतोष भिसे | Published: September 23, 2022 6:54 PM