अशोक पाटील ।इस्लामपूर : राज्यातील राजकीय तापमान कमालीचे वाढले असताना राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आ. जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील भाजपची हवा थंड करण्यासाठी हे ‘जयंत नक्षत्र’ बरसेल का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.
आघाडी सरकारच्या काळात जयंत पाटील यांनी मंत्री असताना जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला. त्यामुळे कार्यकर्त्यांचा ओढा राष्ट्रवादीकडे वाढला होता. मोदी लाटेत मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकीपासून आमदार जयंत पाटील यांचे नेतृत्व मानणाऱ्या अनेकांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपला जवळ केले. त्यानंतर जिल्ह्यातील सत्ताकेंद्रे आ. पाटील यांच्या हातून निसटू लागली. मात्र त्यावेळी आ. पाटील यांनीच आपली फौज भाजपमध्ये धाडली, असे आरोप होऊ लागले.
भाजपने आ. पाटील यांना लॉटरी घोटाळ्यात अडकवून राष्ट्रवादी नेस्तनाबूत करण्याचा डाव आखला. परंतु राष्ट्रवादीवरील संकट टळले. मात्र सांगली जिल्हा परिषद आणि इस्लामपूर नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांवरील जयंत पाटील यांची पकड ढिली करण्यात भाजप यशस्वी झाली. आ. पाटील यांच्या होमपीचवरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना घेऊन फटकेबाजी करण्यास सुरुवात केली.यातून पुन्हा उभारी येण्यासाठी हल्लाबोलची कल्पना राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली. यामध्ये गटनेते असलेल्या आ. जयंत पाटील यांची कामगिरी राज्याच्या कानाकोपºयात पोहोचली. आता तर पक्षसंघटनेची जबाबदारी आ. पाटील यांच्याकडे देण्यात आली आहे.
राज्यातील राष्ट्रवादीची सूत्रे इस्लामपूरकडे आली असली तरी, निर्णय मात्र बारामतीतूनच होणार आहेत, तर इस्लामपुरात भाजपचे निर्णय सदाभाऊ खोत यांच्याकरवी होत आहेत. जिल्ह्यात आणि इस्लामपुरात जयंत पाटील यांच्या माघारी निर्णय घेणारा सक्षम नेता राष्टवादीत आजही तयार झालेला नाही. त्यामुळे भाजपची हवा भरीव होत चालली आहे. त्यातून आगामी महापालिका निवडणुकीबाबत आ. पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता त्यांच्यावर राष्ट्रवादीची राज्याची धुरा आल्याने त्यांना प्रत्येक निर्णय घेताना ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. जिल्ह्यातील भाजपची हवा थंड करण्यासाठी हे ‘जयंत नक्षत्र’ कसे बरसेल, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.स्वागताच्या कमानीजयंत पाटील यांच्या समर्थकांनी इस्लामपूर शहरातील प्रत्येक रस्त्यावर आ. पाटील यांच्या स्वागताच्या कमानी उभ्या केल्या आहेत. आघाडी सरकारमध्ये असताना त्यांना अनेक मंत्रीपदे मिळाली, त्यावेळी कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागत झाले नाही. परंतु प्रदेशाध्यक्षपद मिळाल्यानंतरचे स्वागत म्हणजे भाजपला शह देण्याची तयारी सुरू झाल्याचे बोलले जात आहे.