ते म्हणाले, कडेगाव येथे नोव्हेंबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखानदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला आमदार मोहनराव कदम, विजयबापू पाटील, उमेश जोशी यांच्यासह अन्य कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. मात्र त्यांनी शब्द फिरविला असून, सोनहिरा, उदगिरी आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता सर्वांनी एकरकमी एफआरपी दिली नाही. केवळ प्रतिटन दोन हजार ५०० रुपये पहिला हप्ता जमा केला आहे. ही शेतकऱ्यांशी कारखानदारांनी गद्दारी केली आहे. कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोष असून, त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. संघटना शेतक ऱ्यांबरोबर असून, आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लदाई लढणार आहोत. शब्द न पाळणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आणि गव्हाणीत उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार आहोत. त्याचबरोबर साखर आयुक्तांकडेही तक्रार करणार आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत बिल देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र दीड ते दोन महिन्यानंतर कारखानदार केवळ दोन हजार ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना देत आहेत, ही गंभीर बाब आहे.
चौकट
भजन करूनही कारखानदारांचा निषेध करणार
कडेगाव येथे एकरकमी एफआरपीसाठी बैठक झाली होती. या बैठकीस अनेक कारखान्यांचे पदाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. या सर्वांनी एकरकमी एफआरपी मान्य केली होती. तरीही त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही. म्हणून या बैठकीस उपस्थित असणाऱ्यांच्या घरासमोर भजन करून त्यांचा निषेध करणार आहे, असेही खराडे म्हणाले.