सांगली : नूतन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यापासून कामाचा धडाका लावला आहे. सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून काम करण्याची सूचना त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली आहे. सध्याच्या कामाचा आढावा घेण्यासाठी त्यांनी जिल्हा दौरा सुरू केला आहे. मंगळवारी त्यांनी ‘लोकमत’च्या कार्यालयास भेट देऊन संपादकीय विभागाशी थेट संवाद साधला. अवैध धंद्यांना पायबंद, गुन्हेगारीचे उच्चाटन, सांगली-मिरजेतील वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा ही त्यांच्यासमोरील आव्हाने आहेत. या आव्हानांचा ते कसा सामना करणार? वादग्रस्त पोलिस ठाणी कशी सुधारणार? कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कसे उंचावणार? शहरात रात्री उशिरा सुरूअसलेली हॉटेल्स, परमिट रूम, बिअरबार, दारूची दुकाने बंदकरण्यासाठी कोणती पावले उचलणार? सर्वसामान्यांच्या मनात पोलिसांविषयी असलेली भीती दूर करण्यासाठी कोणते उपाय योजणार? या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी मोकळेपणाने भूमिका मांडली...प्रश्न : मटका बंद होता; तरीही गेल्या दोन वर्षात तो पुन्हा कसा उफाळून आला?उत्तर : मटका असो वा अन्य कोणतेही अवैध धंद ते बंद झालेच पाहिजेत. यासंदर्भात अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. छापा टाकला म्हणजे काम झाले, असे नाही. तो धंदा पूर्णपणे बंद झाला पाहिजे, अशी ताकीदही दिली आहे. ज्या पोलिस ठाण्याच्या हद्दीत धंदे सुरू असल्याचे दिसून येईल, तेथील अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. वेळ पडल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल. पोलिसांच्या कारवाईला लोकांचे आणि माध्यमांचे सहकार्य मिळाल्यास अवैध धंदे बंद होऊ शकतात. प्रश्न : अधिकारी व कर्मचाऱ्यांत बदल्यांबाबत अजूनही अस्वस्थता का आहे?उत्तर : बदल्यांबाबत विशिष्ट नियमावली असते. त्यानुसारच बदल्यांची प्रक्रिया राबविली जाते. अधिकाऱ्यावर जबाबदारी सोपवताना प्रथम त्याची पात्रता तपासली जाते. गुन्ह्यांचा तपास करणे, गुन्ह्यांना आळा घालणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, हे पोलिस ठाण्याचे प्रामुख्याने काम असते. हे काम पेलण्याची पात्रता असलेल्या अधिकाऱ्याची नियुक्ती त्या-त्या ठिकाणी केली जाते. बदल्यांची प्रक्रिया राबविताना अधिकारी व कर्मचारी कधीच खूश नसतात. प्रत्येकाच्या सोयीनुसार पोलिस ठाणे द्यायचे म्हटले, तर प्रशासकीय कारभार चालणार कसा? प्रश्न : पोलिसांच्या कामात बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप वाढत आहे, त्याचे काय करणार?उत्तर : पोलिसांकडून समाजाच्या अनेक अपेक्षा असतात. पोलिस ठाण्यात येणारा माणूस तक्रार घेऊनच आलेला असतो. ठाणे अंमलदाराकडून त्याला जी वागणूक मिळते, ती सर्वात महत्त्वाची असते. त्यामुळे ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सन्मानाची वागणूक देण्याची सूचना केली आहे. तेथे जर व्यवस्थित वागणूक मिळत नसेल, तर नागरिक पुढील कामाची अपेक्षा काय करणार? त्यातून बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप सुरू होतो. गुन्हेगारांना शासन व अन्यायग्रस्तांना न्याय देताना कोठेही कमी पडू नये. कायद्याच्या चौकटीत राहून काम करावे. कोणाच्या दबावाखाली गुन्हे दाखल करू नयेत. ही जर भूमिका घेतली तर बाहेरच्या व्यक्तींचा हस्तक्षेप होणार नाही. जर येथून पुढे तसे होत असल्याचे आढळून आल्यास कडक कारवाई करू. प्रश्न : पोलिसांच्या कामकाजात होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपाचे काय?उत्तर : लोकप्रतिनिधींकडे नागरिक समस्या घेऊन जातात. त्यांची कामे करणे हे लोकप्रतिनिधींचे कामच असते. पोलिसांबाबत काम असेल, तर बहुसंख्य लोक लोकप्रतिनिधींंकडे जातात. अशाप्रकरणात त्यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पोलिसांकडे चौकशी करणे या गोष्टी सहाजिकच होतात. कायदेशीर बाबी तपासून त्यांचे काम करणे किंवा एखादे काम कायद्यात बसत नसेल, तर त्यांना समजावून सांगावे, ही गोष्ट आपल्या हाती असते. त्यांचे किती ऐकायचे, हेही ठरविले पाहिजे. राजकीय दबाव म्हणून नकारात्मकता बाळगण्यापेक्षा त्यांचे म्हणणे ऐकून कायदेशीर गोष्टींची अंमलबजावणी करणे योग्य ठरेल. अधिकारी कायदेशीर वागत असेल तर लोकप्रतिनिधीसुद्धा त्याला सहकार्य करतील. प्रश्न : पोलिसांनी तंदुरुस्त असले पाहिजे, यासाठी काय करणार आहात?उत्तर : पोलिस दलाचे काम न संपणारे आहे. ड्युटीला वेळेचे बंधन नसते. त्यामुळे पोलिस अधिकारी असो अथवा कर्मचारी सर्वांनी तंदुरुस्त असले पाहिजे. शरीर तंदुरुस्त ठेवण्याची जबाबदारी त्यांची आहे. नियमित व्यायाम केला पाहिजे. यासाठी जिममध्येच जायला पाहिजे, असे नाही. सकाळी फिरायला जाणे, जोर, बैठका मारल्या तरी ते तंदुरुस्तीच्याद्दष्टीने महत्त्वाचे ठरेल. व्यसनांचा त्याग केला पाहिजे. आळस आपला शत्रू असतो. त्याला सर्वप्रथम बाजूला करून तंदुरुस्तीसाठी थोडा वेळ दिलाच पाहिजे. शासनाकडून आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी भत्ताही दिला जातो. प्रश्न : शहरात रात्री अकरानंतर चालणाऱ्या बेकायदेशीर व्यवसायांना पायबंद कसा घालणार?उत्तर : सर्वप्रथम शहरात रात्री अकरानंतर सुरू असणारी हॉटेल्स, परमिट रूम, बिअरबार, दारूची दुकाने, खाद्यविक्रीचे हातगाडे व पान दुकाने बंद करण्याची मोहीम सुरू करणार आहे. अपघाताला आळा घालण्यासाठी दारूच्या नशेत वाहन चालविणाऱ्या तळीरामांवर कारवाई सुरू केली जाणार आहे. मी काय करणार, हे बोलण्यापेक्षा कृतीतून लवकरच दिसून येईल. - सचिन लाडप्रस्थापित पोलिसांना दणकावर्षानुवर्षे शहरातच काम करणाऱ्या प्रस्थापितांची नावे शोधून त्यांच्या ग्रामीण भागात बदल्या केल्या आहेत. शहर परिसरातच पोलिस ठाणे मिळावे, यासाठी ते विविध कारणे दाखवतात. खोटी कारणे बदलीसाठी सांगू नयेत, अशी सक्त सूचना केली आहे. शहरात काम केलेल्या पोलिसांना ग्रामीण भागात गेलेच पाहिजे. सध्या कार्यरत असलेल्या विशेष पथकातही बदल केला जाईल, असे शिंदे म्हणाले. औटपोस्ट सुरू करणारवाळवा तालुक्यातील पेठ, तांदूळवाडी, मिरज तालुक्यातील म्हैसाळसह जिल्ह्यात बंद पडलेली औटपोस्ट सुरू करणार आहे. तेथे २४ तास पोलिस असलेच पाहिजेत. महामार्ग आणि सीमावर्ती भागात औटपोस्ट असलेच पाहिजे. पोलिसांच्या निवासस्थानाचाही प्रश्न गंभीर आहे. निवासस्थानांची दुरुस्ती तसेच नवीन बांधकामासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावा केला जाईल. पोलिस जेथे नोकरी करतो, तेथेच त्याच्या निवासाची उत्तम सोय असेल, तर कामाच्याद्दष्टीने प्रभावी ठरते, असे शिंदे यांनी यावेळी सांगितले.
रात्रीच्या सांगलीवर ‘वॉच’ ठेवणार
By admin | Published: June 21, 2016 11:02 PM