लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपुरातील कोविड रुग्णालयांच्या बिलांचे आणि मृत्यूचे ऑडिट करण्याचा आदेश दिला आहे. मात्र या आदेशाची अंमलबजावणी होणार की, पहिल्या लाटेतील ऑडिटच्या आदेशासारखीच ही घोषणाही हवेतच विरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इस्लामपुरात एक शासकीय आणि दोन खासगी कोविड चाचणी केंद्रे आहेत. या केंद्रांमध्ये दररोज सरासरी दोनशेवर रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह येतात. येथील उपजिल्हा रुग्णालयातील शासकीय कोविड रुग्णालय वगळता शहरात आणि आष्टा येथे १४ खासगी कोविड रुग्णालये आहेत. या रुग्णालयांत कोविडचे ६८९ बेड आहेत. बाधितांपैकी ७० टक्क्यांहून अधिक रुग्ण खासगी रुग्णालयांत उपचार घेतात, तर ३० टक्के रुग्ण बेडच्या शोधासाठी धावाधाव करतात. याचा गैरफायदा काही खासगी रुग्णालये घेतात. भरमसाट अनामत रक्कमा घेतल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेत नाहीत.
सोमवारी आढावा बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी शहरातील सर्वच रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी घेतली. ही शासकीय आकडेवारी आहे. परंतु घरी उपचार घेऊन मृत झालेल्या रुग्णांची संख्या वेगळीच आहे. खासगी रुग्णालयांत रुग्णांना वेळेत सुविधा मिळत नाहीत. व्हेंटिलेटरची संख्या कमी आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. वेळेत आणि योग्य उपचार होत नसल्याने रुग्ण दगावत आहेत. मृतांची आकडेवारी पाहिल्यानंतर पाटील यांनी बिलाचे आणि मृत्यूचे ऑडिट करण्याचा आदेश दिला. मात्र पहिल्या लाटेतही खासगी रुग्णालयांच्या बिलासंदर्भात ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. त्याचा अहवाल समजलाच नाही. त्यामुळे आताही खरेच ऑडिट होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चौकट
तडजोड करणाऱ्या संघटनाच अधिक
शहरातील खासगी कोविड रुग्णालयांत मोठ्या अनामत रकमा घेतल्या जात आहेत. अखेरीस लाखो रुपयांचे बिल येते. अशा रुग्णालयांपैकी काहींना हेरून आवाज उठवण्याचे ‘नाटक’ काही सामाजिक संघटनांकडून होते. मात्र काही रुग्णालयांकडे कानाडोळा केला जातो. आधी आवाज उठवून नंतर तडजोडीची भाषा करणाऱ्या संघटना अधिक आहेत.