सांगली : राज्यातील नेतृत्व बदलाबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, हे माहीत नाही. विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांनी होणार आहेत. त्यामुळे नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे, असे रोखठोक मत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. यात निश्चितच काँग्रेस आघाडीला यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर प्रथमच सांगली दौर्यावर आलेल्या कदम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री बदलाबाबत ते म्हणाले की, पक्षातील काहीजण मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करीत आहेत. पुण्याच्या बैठकीत दीपक मानकरांनी व्यक्तिश: मागणी केली. त्याबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेईल, हे माहीत नाही; पण पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा काळ उरला आहे. आता नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे? विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून काँग्रेस निश्चित यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते. लोकसभा निवडणुकीत देशाचे, तर विधानसभेवेळी राज्यातील प्रश्न मांडले जातात. त्यामुळे या पराभवाचा फारसा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येईल; पण त्यासाठी पक्षाला सतर्क रहावे लागेल. प्रत्येक मतदारसंघात बारकाईने लक्ष घालून निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेही पराभवाचे चिंतन करीत आहेत. पुढील काळात जनतेला गृहित धरून जाण्याचे राजकारण चालणार नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला केवळ मोदी लाटच नव्हे, तर अनेक कारणे आहेत. नरेंद्र मोदींनी दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली सुरू केली होती. प्रसारमाध्यमांनीही मोदींची हवा तयार केली. त्याचा परिणाम तरुणांवर झाला. गॅस दरवाढ, महागाईने महिला त्रस्त होत्या. या सार्याचा परिपाक म्हणून भाजपला ‘न भूतो’ यश मिळाले. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस शून्यावर आली. अशोक चव्हाण व राजीव सातव यानांच यश मिळाले. मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होतात की नाही, यावर लक्ष ठेवावे लागेल. (प्रतिनिधी)
नवा मुख्यमंत्री काय दिवे लावणार ?
By admin | Published: May 21, 2014 1:06 AM