नितीन पाटील बोरगाव : वाळवा तालुक्याच्या उत्तर भागातील बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांना तेथून मताधिक्य मिळणार की धक्का बसणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.इस्लामपूरविधानसभा मतदारसंघातील वाळवा तालुक्याचा उत्तर भाग राष्ट्रवादीच्या हुकमी मतदारांचा गड मानला गेला आहे. या उत्तर भागातील बोरगाव हे जयंत पाटील यांचे दत्तक गाव आहे. त्याशिवाय ताकारी, जुने-नवेखेड, मसुचीवाडी, फार्णेवाडी, साटपेवाडी, रेठरेहरणाक्ष, गौंडवाडी, बनेवाडी, बहे, खरातवाडी, हुबालवाडी, भवानीनगर, दुधारी ही गावे या परिसरात येतात.
जयंत पाटील यांनी राजकारणाची मुहूर्तमेढ बोरगावमधूनच रोवली आहे. आजअखेर परिसरातील गावांनी त्यांना मताधिक्य दिले आहे. परंतु गत पाच वर्षापासून येथील समीकरणे बिघडत असल्याचे दिसत आहे.आमदार पाटील यांना आता वाळव्यातून वैभव नायकवडी, गौरव नायकवडी, बोरगावातून जितेंद्र पाटील काँग्रेस, ताकारीत सतीश सावंत यांचा विरोध वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत या परिसरामध्ये जयंत पाटील यांचेच गट एकमेकांसमोर लढत होते. जि
तेंद्र पाटील यांनी दहा वर्षे आ. पाटील गटाला झुंज देत जिल्हा परिषद, पंचायत समितीचे गट व ग्रामपंचायत ताब्यात ठेवले आहे. आज काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र लढली तरी, जितेंद्र पाटील आघाडीचा धर्म पाळतील का, हा प्रश्न आहे.महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा भाजपला मिळाली तरी, इच्छुक निशिकांत पाटील यांना पक्षातूनच मोठा विरोध आहे. कडकनाथ प्रकरणात संशय निर्माण झाल्यामुळे सदाभाऊ खोत इच्छुकांमधून बाजूला पडले आहेत. यामुळे गौरव नायकवडी यांचे नाव पुढे आले आहे.या पार्श्वभूमीवर मागील सर्व निवडणुकांपेक्षा यंदा जयंत पाटील यांना अधिक मतदान मिळणार की, गावागावातील त्यांच्याच दोन-दोन गटांतील संघर्ष, काँग्रेससह भाजप महायुतीतून होणारा विरोध यामुळे त्यांचे मतदान घटणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.