"पंचवीस वर्षांचा होईपर्यंत समोर काही शिल्लक ठेवत नाही", आर. आर. आबांच्या मुलाचा विरोधकांना इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2021 02:53 PM2021-12-15T14:53:42+5:302021-12-15T15:03:28+5:30
कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. ही लढत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी अशी होत आहे.
सांगली : माझ्याविरोधात सगळे एकत्र आले आहेत, ही गोष्ट खरी आहे, पण मी आता २३ वर्षाचा आहे, पंचवीस वर्षाचा होईपर्यंत समोर काही शिल्लक ठेवत नाही, असा इशारा आर. आर. पाटील यांचे पूत्र व राष्ट्रवादीचे युवक नेते रोहित पाटील यांनी विरोधकांना दिला.
कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने रोहित पाटील यांच्या राजकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी ही निवडणूक स्वबळावर लढवत आहे. महाविकास आघाडीत एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि शिवसेनेने या ठिकाणी भाजपशी आघाडी केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप, शिवसेना, काँग्रेस, शेतकरी विकास आघाडी अशी लढत होत आहे. राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी कवठेमहांकाळ येथे पदयात्रेने झाला.
यावेळी प्रचार सभेत अनेक नेत्यांनी त्यांच्या भाषणात पंचवीस वर्षाच्या तरुणाला हरवण्यासाठी सर्व विरोधक एकवटल्याचे मत मांडले. हा धागा पकडत रोहित पाटील म्हणाले, आपण सगळ्यांनी सांगितले २५ वर्षाच्या तरुणाला हरवायला सगळे एकत्र आले आहेत, पण आता माझे वय २३ आहे, पण २५ वर्षाचा होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा विरोधकांना दिला.
आर.आर. गट विरुद्ध सर्व
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ दिवंगत राष्ट्रवादी नेते आर.आर. आबा पाटील यांचा गड मानला जातो. त्यांना खासदार संजयकाका पाटील यांच्याशी नेहमीच संघर्ष करावा लागला. त्याच मतदार संघातल्या कवठेमंकाळ नगरपंचायत निवडणूकीच्या माध्यमातून भाजपाचे खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे, महांकाली साखर कारखान्याच्या अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीला म्हणजेच आर.आर.पाटील गटाला नगरपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने आव्हान दिले आहे.