पाटण : ‘जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काठावरचा पराभव झाला. पराभव झाला म्हणून मी तोंड लपवून बसणाऱ्यांपैकी नाही. असे अनेक पराभव मी पचविले आहेत. आणि देदीप्यमान विजय सुद्धा साजरे केले आहेत. यापुढे कार्यकर्त्याने पेटून उठले पाहिजे. मी वाड्यातून बाहेर काढलेली आमदारकी परत वाड्यात जाऊ देणार नाही,’ असा घणाघात आमदर शंभूराज देसाई यांनी दिला. दौलतनगर (मरळी) येथे देसाई गटाच्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते.आमदार देसाई म्हणाले, ‘आमदारांना घरी बसा असे म्हणणाऱ्या सत्यजित पाटणकरांनी झालेल्या विजयाने हुरळून जाऊ नये. आपण १९१४ च्या पराभवानंतर वाड्यात लपून बसला होता. आता निवडणूक आली म्हणून दोन महिन्यांपूर्वी बाहेर पडला. कार्यकर्त्यांनो प्रत्येक पोलिंगचा अभ्यास करा. आपण कुठे कमी पडलो आणि ज्या गावांमध्ये दोन वर्षांत विकासकामे दिली त्या गावांमध्ये का मतदान झाले नाही याचा मी अभ्यास करणार आहे. आणि यापुढे विकासकामांना निधी कमी पडणार नाही. त्यासाठी मी झटणार आहे. पराभवाने खचू नका. राजकारणात चढ-उतार होतच राहतात,’ असे आवाहन आमदार देसार्इंनी कार्यकर्त्यांना केले. दोन वर्षांत जी कामे केली त्यावर जनता मतदान करेल, अशी मानसिकता होती. पण दुर्दैवाने आपला पराभव झाला.यावेळी रविराज देसाई, जयवंतराव शेलार, डी. आर. पाटील, अशोकराव पाटील, डी. पी. जाधव, विजय पवार, हरीष भोमकर, नथूराम सावंत व सर्व नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमदारकी वाड्यात जाऊ देणार नाही
By admin | Published: March 01, 2017 11:48 PM