अशोक पाटीलइस्लामपूर : राष्ट्रवादीच्या परिवार संवाद यात्रेच्या येथील सभेमध्ये राजारामबापू पाटील कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचे कौतुक प्रदेशाध्यक्ष तथा पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले. त्यातून त्यांनी या ज्येष्ठांचे राजकारणातून सेवानिवृत्तीचे संकेत दिले आहेत. आगामी काळात युवा नेते प्रतीक पाटील यांना तेथे संधी मिळण्याची शक्यता आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीअगोदर राजारामबापू साखर कारखाना आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांची प्रकृती साथ देत नाही. त्यांना राज्य सहकारी संघाची जबाबदारी देण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा प्रतीक पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.राजारामबापू बँकेच्या प्रगतीत अध्यक्ष प्रा. शामराव पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी यापूर्वीच अध्यक्षपदावरून सेवानिवृत्त होण्याचे निश्चित केले होते. परंतु जयंत पाटील यांनी हिरवा कंदील दाखविलेला नाही. आगामी काळात बँकेवर युवा कार्यकर्त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. प्रा. पाटील आजही अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्यासाठी सक्षम असल्याचे दिसतात. राजारामबापू उद्योग समूहातील या दोन ज्येष्ठ नेत्यांना जयंत पाटील विश्रांतीचा सल्ला देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या दोघांची राष्ट्रवादीत ज्येष्ठ नेते म्हणून गणना होऊ शकते. त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील आणि मी यापूर्वीच सेवानिवृत्त होण्याचा निर्णय जयंत पाटील यांना सांगितला आहे. त्यामुळे राजारामबापू उद्योग समूहातून निवृत्त होण्याची चर्चा नवी नाही. - प्रा. शामराव पाटील, अध्यक्ष, राजारामबापू सहकारी बँक