सांगली : हळदीवर पाच टक्के जीएसटी आकारणीच्या निर्णयाविरोधात पाठपुरावा करण्याचे आश्वासन चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिले. त्यांनी गुरुवारी सांगलीत कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली. सभापती दिनकर पाटील यांनी स्वागत केले.
हळदीवरील जीएसटी आकारणीविषयी पाटील यांनी गांधी यांना माहिती दिली. ते म्हणाले, हळद हा शेतमाल असूनही जीएसटी आयुक्तांनी चुकीचा निर्णय घेतला आहे. यामुळे हळदीच्या आवकेवर परिणाम होण्याची भीती आहे.भावदेखील कमी मिळणार आहे, त्यामुळे हळदीवरील जीएसटी आकारणी रद्द करण्यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने पाठपुरावा करावा. गांधी म्हणाले की, यासंदर्भात राज्यातील सर्व बाजार समित्यांचा समन्वय साधला जाईल. हळदीवर कोणतीही करआकारणी होऊ नये यासाठी पाठपुरावा करू.
यावेळी व्यापारी व अडत्यांनी व्यावसायिक अडचणी गांधी यांच्यापुढे मांडल्या. बैठकीला चेंबर ऑफ कॉर्मसचे संचालक भालचंद्र पाटील, स्वप्निल शहा, बाजार समितीचे संचालक वसंतराव गायकवाड, जीवन पाटील, बाळासाहेब बंडगर, सचिव महेश चव्हाण, अडत संघटनेचे अध्यक्ष अमर देसाई, माजी उपमहापौर प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.