लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी केलेले डॉ. रवींद्र आरळी पुन्हा एकदा भाजप पक्षात सक्रिय होणार असून, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांची त्यांनी जत येथे भेट घेतली. या भेटीत दोघांमध्ये राजकीय खलबते झाल्याची चर्चा सुरु आहे.
डॉ. रवींद्र आरळी हे भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून, गेली २५ वर्षे जत तालुक्यात भाजपच्या वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जत विधानसभा मतदारसंघात २००९मध्ये आमदार प्रकाश शेंडगे यांना भाजपने उमेदवारी दिली. प्रकाश शेंडगे यांना आमदार करण्यात डॉ. रवींद्र आरळी यांचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर २०१४मध्ये डॉ. आरळी हे विधानसभेसाठी इच्छुक होते. मात्र, त्यावेळी भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यावेळी पक्षाचा आदेश मानून डॉ. रवींद्र आरळी यांनी विलासराव जगताप यांचा प्रचार केला आणि विजय खेचून आणला.
विलासराव जगताप आमदार झाल्यानंतर जत तालुक्यात भाजपमध्ये जगताप व आरळी असे दोन गट कार्यरत राहिले. या दोन्ही गटांमध्ये अखेरपर्यंत मनोमिलन झालेच नाही. २०१९च्या निवडणुकीत भाजपकडून डॉ. रवींद्र आरळी यांनी उमेदवारी मागितली. डॉ. रवींद्र आरळी यांना उमेदवारी मिळेल, असे संकेत मिळत असताना पक्षाने पुन्हा माजी आमदार विलासराव जगताप यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज झालेले डॉ. आरळी यांनी बंड पुकारत विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करत तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढवली. या विधानसभा निवडणुकीत त्यांना लक्षणीय मते मिळाली. डाॅ. आरळी यांच्या बंडखोरीचा फटका भाजपचे उमेदवार विलासराव जगताप यांना बसला. जगताप यांचा पराभव झाला. त्यानंतर डॉ. रवींद्र आरळी हे भाजप पक्षापासून चार हात लांबच राहिले.
चाैकट
बैठकीत होणार निर्णय
डॉ. आरळी यांनी मला पक्षात चांगली संधी द्या. यापुढे मी पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणार, असे सांगितल्याचे समजते. पृथ्वीराज देशमुख यांनी कोअर कमिटीच्या बैठकीत आपल्याला पुन्हा एकदा पक्षात प्रवेश देऊन मोठी जबाबदारी देऊ, असे आश्वासन दिले आहे. पुन्हा एकदा डॉ. आरळी हे भाजपमध्ये सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू आहे.