सांगली : कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अनेक संस्थांमध्ये अडकल्या आहेत. आंदोलने करूनही संस्थाचालक व जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून ठेवीची रक्कम परत देण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. त्यामुळे नववर्षाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना शेकडो इच्छामरण प्रतिज्ञापत्रे पाठविण्याचा निर्णय निरपराध नामधारी संचालक, कर्मचारी, ठेवीदार महासंघाच्या सोमवारी सांगलीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रताप चौधरी होते.संस्था प्रमुखांच्या घरासमोर कुटुंबासह आक्रोश छावणी आंदोलन करणे, उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयासमोर प्रतिकात्मक गळफास आंदोलन करणे, ग्राहक न्यायालयाने वसुलीचे आदेश देऊन सुद्धा त्याची अंमलबजावणी होत नसल्याने भ्रष्टाचारी संस्था चालकांना अचानक केव्हाही कोठेही तोंडाला काळे फासून मानहानी करणे, आदी ठराव या बैठकीत करण्यात आले. कष्टाच्या व घामाच्या ठेवी, विविध मार्गाने पाठपुरावा करून सुद्धा मिळत नसल्याने नाईलाजास्तव इच्छामरणाचे प्रतिज्ञापत्र सामूहिकरित्या राष्ट्रपतींना नवीन वर्षाच्या प्रारंभी पाठविण्याबाबतचा ठरावही करण्यात आला. यावेळी अनिल मांगले यांनी, ठेवीची रक्कम परत मिळविण्यासाठी कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला. प्रकाश पाटील यांनी, संस्था चालकांच्या मालमत्तेवर शासनाने टाच आणण्यासाठी ठेवीदारांनी जनहित याचिका दाखल करावी, असे मत मांडले. इच्छामरण प्रतिज्ञापत्रे १५ डिसेंबरपासून पाठविली जाणार आहेत. राजाराम देसाई यांनी आभार मानले. यावेळी ठेवीदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
राष्ट्रपतींना इच्छामरण पत्रे पाठविणार
By admin | Published: December 07, 2015 11:40 PM