फोटो : २४अविनाश पाटील, २४अमोल काळे, २४संजय चव्हाण
दत्ता पाटील
तासगाव : तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीचा पल्ला लांब असला तरी पालिकेचे शिखर सर करण्यासाठी जुळवाजुळवीला सुरुवात झाली आहे. शहरात आजवर अदखलपात्र असणारी शिवसेना माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांच्या पक्षप्रवेशाने दखलपात्र झाली आहे. मात्र, तासगाव नगरपालिका निवडणुकीचे शिवधनुष्य शिवसेना पेलणार का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
तासगाव शहरात आबा गट विरूध्द काका गट अशा पारंपरिक गटातच बहुतांश पालिका निवडणुका झाल्या. नेत्यांचा पक्ष बदल झाला, तरी पक्षापेक्षा नेता हा पक्ष माणून कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवल्या. त्यामुळेच गतवेळच्या निवडणुकीत पालिकेत भाजपचा झेंडा फडकला. पालिकेच्या राजकारणात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील नेत्यांना टक्कर देत काँग्रेसनेही स्वत:चे उपद्रवमूल्य दाखवून दिले होते. मात्र, शहरात शिवसेनेचे आजपर्यंत अस्तित्व निवेदन आणि आंदोलनापुरतेच मर्यादीत राहिले होते. तालुकाप्रमुुख अमोल काळे आणि शहरप्रमुख संजय चव्हाण यांनी शहरात आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेनेचे अस्तित्व टिकवण्याचे काम केले. मात्र, तरीही पालिकेच्या निवडणुकीत शिवसेना अदखलपात्र राहिली.
काही दिवसांपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांचे कट्टर समर्थक आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष अविनाश पाटील यांनी भाजपशी फारकत घेत शिवसेनेत पक्षप्रवेश केला. तासगावच्या राजकारणात खासदारांसाठी रणनिती तयार करण्यासाठी एकेकाळी पुढाकार घेणारे पाटील आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. अविनाश पाटील यांचे स्वत:च्या प्रभागात वर्चस्व आहे. त्यांंचे भाजपमधील जुन्या सहकाऱ्यांशीही चांगले नेटवर्क आहे. या नेटवर्कचा फायदा करून भाजपमधील ताकदीचे नाराज कितपत गळाला लावणार, यावर सेनेचे शहरातील दखलपात्र भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे निवडणुकीच्या निमित्ताने शहरात दखलपात्र झालेली शिवसेना पालिकेच्या रणांगणात शिवधनुष्य पेलणार का? याचे औत्सुक्य आहे.
चौकट :
सेना, काँग्रेसमध्ये खलबतांची चर्चा
राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. तशीच महाविकास आघाडी पालिकेच्या निवडणुकीत होईल, अशी चर्चा आहे. मात्र, या महाविकास आघाडीचे भवितव्य जागावाटपावर अवलंबून आहे. या घडामोडींना अद्याप अवधी असला तरी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि काँग्रेसच्या स्थानिक कारभाऱ्यांमध्ये खलबते झाल्याची चर्चा आहे.