सांगली - वृत्तपत्र विक्रेता हा वृत्तपत्र वितरणातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. वृत्तपत्र वितरणात विक्रेते, एजंटचे योगदान मोठे आहे. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता त्यांचे काम विनासुट्टी सुरू असते. त्यामुळे त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी निश्चितच सर्वतोपरी प्रयत्न करू, असा विश्वास राज्याचे कामगार मंत्री डाॅ. सुरेश खाडे यांनी शनिवारी येथे दिला.
सांगली जिल्हा वृत्तपत्र विक्रेता एजंट असोसिएशनच्या जिल्हा मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. मराठा समाज भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार सुधीर गाडगीळ, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, राज्य अध्यक्ष सुनील पाटणकर, कार्याध्यक्ष बालाजी पवार, सरचिटणीस विकास सूर्यवंशी, कोषाध्यक्ष राजेंद्र टिकार यांच्यासह वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
डाॅ. खाडे म्हणाले, असंघटित कामगारांसाठीच्या महामंडळातून विविध प्रकारचे लाभ घेण्यासाठी वृत्तपत्र विक्रेत्यांनी नोंद करावी. जिल्ह्यात, तालुक्याच्या ठिकाणी वृतपत्र वितरणासाठी हाॅल उभारण्यासाठी (सेंटरशेड) निधी देऊ. आमदार सुधीर गाडगीळ यांनी वृत्तपत्र विक्रेता भवन साठी १५ लाखाचा निधी देत असल्याची घोषणा केली. तर सुनील पाटणकर यांनी सर्व संघटित क्षेत्रासाठी केलेल्या कल्याणकारी मंडळामध्ये आम्हाला न्याय मिळणार नाही त्यामुळे आमचे स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ करावे, अशी मागणी केली.आदर्श वृत्तपत्र विक्रेता पुरस्कारनारायण माळी, सुभाष चौगुले, प्रदीप आसगावकर, तुकाराम पाटील, सुभाष जाधव - मिरज, चंद्रकांत जोशी - नागठाणे, यांना आदर्श वृत्तपत्र विक्रेता म्हणून गौरविण्यात आले. तसेच उपस्थित सर्वांना वृत्तपत्र वाटपासाठी मोफत पिशवीचे वाटप करण्यात आले.