दत्ता पाटील - तासगाव -राज्य शासनाने बाजार समित्या नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत रद्द करण्यात आली आहे. तासगाव बाजार समितीकडून मागील आर्थिक वर्षात १३ कोटींची अडत वसूल करण्यात आली होती. यापुढे वर्षाला केवळ तासगावातून १३ कोटींची अडत वाचणार आहे. असे असले तरी बेदाणा व्यापार पाहिल्यास शेतकऱ्यांचे हित व्यापाऱ्यांच्याच हातात राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नेमके वास्तव जाणून घेण्यासाठी सौद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या बाजार समित्या नियमनमुक्तीच्या धोरणानुसार, यापुढे व्यापाऱ्यांकडून अडत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. केवळ तासगाव बाजार समितीत मागील वर्षात शेतकऱ्यांकडून बेदाण्याच्या माध्यमातून तब्बल १३ कोटींची अडत वसूल करण्यात आली होती. यापुढे या शेतकऱ्यांचा तेवढा फायदा अडत बंदमुळे होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे नेमके फलित व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर निश्चित होणार आहे. कारण अडतीचे दोन रुपये शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत. व्यापाऱ्यांकडून या दोन रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडूनच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांकडून स्वत:चे आर्थिक हित साधण्यासाठी बेदाण्याची खरेदी कमी दराने केली जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वरकरणी वाटणारा शेतकऱ्यांचा नफा शेतकऱ्यांना मिळेल का, याचे नेमके उत्तर जाणून घेण्यासाठी सौद्याची वाट पहावी लागणार आहे.अडतदारांना नोटीस शासनाच्या निर्णयानंतर १४ तारखेपासून तासगावात अद्यापर्यंत बेदाणा सौदे झालेले नाहीत. खरेदीदारांनी पाठ फिरवली असल्याने सौदे झाले नसल्याचे अडतदारांकडून सांगण्यात येत आहे. तर बाजार समितीने सोमवारपासून सौदे सुरू करण्याबाबत अडतदारांना नोटिसा बजावल्या आहेत. सौदे सुरु झाले नाहीत, तर पणनच्या नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सभापती अविनाश पाटील यांनी दिली.बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला बेदाणा सौद्यातून खरेदीदारांकडून शंभराला पंचवीस पैशांप्रमाणे सेवा शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. मागील आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. शासनाच्या धोरणामुळे यापुढे बाजार समितीबाहेरच बेदाण्याची विक्री झाल्यास बाजार समितीचे उत्पन्न ढासळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना परस्पर विक्रीचा धोकाही आहे. बाजार समितीत बेदाणा विक्री झाल्यास, बेदाणा रकमेची जबाबदारी बाजार समितीकडे असते. मात्र परस्पर विक्री झाल्यास शेतकऱ्याची फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसे अनुभव यापूर्वी द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना आलेले आहेत.
तासगावात १३ कोटींची अडत वाचणार?
By admin | Published: July 16, 2016 11:19 PM