सांगली : शेतकऱ्यांसाठी काम करण्याची अनेक वर्षांपासून माझी इच्छा होती. आता ती पूर्ण करण्याची संधी मला मिळाली असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच महाविकाआघाडीचे सरकार सूड काढणारं नसून सरकारला शेतकरी सर्वात महत्वाचे आहे असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत इस्लापूर येथील राजारामबापू पाटील सहकारी दूध संघाच्या वतीने उभारण्यात आलेल्या दुधभुकटी प्रकल्पाचे व पशुखाद्य प्रयोगशाळेचा शुभारंभ आज उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पशुधन चांगले राहण्यासाठी फिरतं चिकित्सालय सुरु करणार असल्याचे आश्वासन देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.
उध्दव ठाकरे यांचे सांगली जिल्ह्यातील साखराळे येथील हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार धैर्यशील माने, आमदार अनिल बाबर, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, राजारामबापू सहकारी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. आर. पाटील, बजरंग पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले, वाळवा उपविभागीय अधिकारी नागेश पाटील, तहसिलदार राजेंद्र सबनीस आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अधिकारी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन उर्त्स्फूतपणे स्वागत केले.