लक्ष्मण सरगरआटपाडी : लोकसभा निवडणुकीनंतर आता राजकीय नेतेमंडळींना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. खानापूर विधानसभेला विट्याच्या नेत्यांना २५ वर्षांपासून माजी आमदार राजेंद्र देशमुख मदत करून निवडून आणत आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत विट्यातील माजी आमदारांचे पुत्र सुहास बाबर व वैभव पाटील हे राजेंद्र देशमुख यांचा राजकीय पैरा फेडणार का? असा सवाल आटपाडीकर उपस्थित करू लागले आहेत.खानापूर-आटपाडी विधानसभेसाठी १९९५ साली अपक्ष म्हणून निवडणूक लढवत राजेंद्र देशमुख विजयी झाले होते. त्या वेळी माजी आमदार हणमंतराव पाटील व ॲड. सदाशिव पाटील यांनी देशमुख यांना विट्यातून मदत केली. त्यामुळे कॉंग्रेसचे तत्कालीन आमदार अनिल बाबर यांचा पराभव झाला होता. १९९९ साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यावर राजेंद्र देशमुख व अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर तत्कालीन आमदार राजेंद्र आण्णा देशमुख यांनी अनिल बाबर यांना १९९९ च्या निवडणुकीत सहकार्य केले. ते पैरा फेडण्याच्या अटीवर बाबर यांना विजयी केले.म्हणून आटपाडीचा आमदार नाही२००४ च्या निवडणुकीमध्ये अनिल बाबर यांनी राजेंद्र देशमुख यांना संधी देण्यास व पैरा फेडण्याचे नकार दिला. त्यामुळे विटा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. सदाशिवराव पाटील यांना राजेंद्र देशमुख यांनी पाठिंबा देत विजयी केले. या वेळी ही पाटील यांच्याकडून पैरा फेडण्याची ग्वाही देण्यात आली होती. मात्र पाटील यांनी ही २००९ ला देशमुख कुटुंबाला साथ दिली नाही. त्यामुळे आटपाडीचा आमदार झालाच नाही.
विटेकर नेत्यांनी मोठेपणा दाखवावा..सध्या माजी आमदार राजेंद्र देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर हे सध्या महायुतीमध्येच आहेत. आगामी खानापूर विधानसभेच्या निवडणुकीत विट्यातील पाटील व बाबर पुत्राने तरी आपल्या वडिलांसाठी झालेल्या राजकीय पैऱ्याची परतफेड करावी, अशी मागणी आटपाडीकरांची आहे. तिघेही वेगवेगळ्या पक्षांत असले तरी सध्या ते महायुतीमध्येच आहेत. यामुळे विटेकर नेत्यांनी मोठे मन दाखवून आता आटपाडीचा पैरा फेडण्याची वेळ आल्याची चर्चा आहे.