सांगली : लठ्ठे शिक्षण संस्थेवर भ्रष्टाचाराचे आरोप करून सातत्याने बदनामी करणाऱ्यांविरोधात संस्था कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शांतिनाथ कांते व सचिव सुहास पाटील यांनी दिली. संस्थेचे संचालक प्रा. शरद पाटील यावेळी उपस्थित होते.
कांते व प्रा. पाटील म्हणाले की, लठ्ठे संस्थेने दक्षिण महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकात शिक्षण क्षेत्रात मानदंड निर्माण केला आहे. पण गेल्या दीड-दोन वर्षांपासून काही हितशत्रू संस्थेवर सातत्याने चिखलफेक करत आहेत. महिला वसतिगृहातील प्रवेश, सांगली हायस्कूलमधील पोषण आहार वाटप अशा विषयांवरुन भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यांच्या आरोपांची शासकीय संस्थांनी रितसर चौकशी केली आहे, त्यामध्ये संस्थेवरील आरोपांत कोणतेही तथ्य आढळलेले नाही.
ते म्हणाले की, संस्थेच्या विविध शाखांत तीन वर्षे शिक्षण सेवक म्हणून काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव आम्ही ठेवला आहे. यालाही आकस बुद्धीने विरोध करून शासकीय यंत्रणेला वेठीस धरले जात आहे. आरोप करणाऱ्यांचा संस्थेशी काहीही संबंध नाही.
चौकट
रयतशी तुलना नको
कांते म्हणाले की, संस्थेच्या कारभारात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न काही हितशत्रू करत आहेत. त्यांच्यावरही संस्था कायदेशीर कारवाई करणार आहे. लठ्ठे संस्थेतील कारभाराची तुलना रयतमधील गैरप्रकाराशी करण्याचा प्रकार निषेधार्ह आणि कारवाईयोग्य आहे.
------