शरद जाधव - भिलवडीतासगाव-पलूस तालुका सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात चार वर्षांपासून सुरू असलेल्या सभासद व कामगारांच्या लढ्याला यश मिळत नसल्याचे चित्र आहे. यंदा तर कारखाना सुरू होणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्याच्या निर्मितीपासून अधोगतीपर्यंत साक्षीदार आणि संचालक मंडळावर असणाऱ्या गृहमंत्री व आर. आर. पाटील व वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी कारखाना सुरू करण्यासाठी कोणतीही ठाम भूमिका घेतलेली नाही. सरकारच्या माध्यमातून त्यांनी राज्य बँकेवर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले नसल्याने सभासद, कामगारांत प्रचंड नाराजी आहे. यामुळे दोघांनी आतातरी ठोस भूमिका जाहीर करावी, अशी मागणी त्यांचेच कार्यकर्ते करीत आहेत.तासगाव कारखान्याची विक्री प्रक्रिया रद्द करावी, तो राज्य बँकेने अवसायकांच्या ताब्यात देऊन दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालवण्यास द्यावा, या मागणीसाठी चार वर्षांत कामगार संघटना, प्रा. एन. डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील कारखाना बचाव समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, तासगाव-पलूस तालुक्यांतील सभासद, ऊसउत्पादक लढत आहेत. मात्र राज्य बँकेचे अधिकारी ऐकत नसल्याचा डांगोरा गृहमंत्री, वनमंत्री, सहकारमंत्री ते मुख्यमंत्री पिटत आहेत. सरकारचे जर राज्य बँक ऐकत नसेल, तर ते सरकार आमच्या काय कामाचे? आम्ही यांना निवडून का द्यायचे?, अशी विचारणा त्यांचे कार्यकर्ते करू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी आर. आर. पाटील यांच्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात, तर डॉ. पतंगराव कदम यांच्या कडेगाव-पलूस मतदारसंघामध्ये २६ हजार ऊस उत्पादक, सभासद शेतकरी धक्का देण्याच्या मानसिकतेत आहेत.तासगाव व पलूस तालुक्यातील १०५ गावांच्या कार्यक्षेत्रात दिनकरआबा पाटील यांनी १९८८ मध्ये तासगाव कारखान्याची निर्मिती केली. अठरा जणांच्या संचालक मंडळावर दिनकरआबा व डॉ. पतंगराव कदम गटाचे वर्चस्व होते. १९९०-९१ मध्ये ते १३ जणांचे करून, शरद पवार मुख्यमंत्री असताना आर. आर. पाटील आबांनी शासननियुक्त संचालक म्हणून एन्ट्री केली. दिनकरआबा अध्यक्ष, तर आर. आर. आबा उपाध्यक्ष होते. १९९४ मध्ये कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली. आर. आर. पाटील व पतंगराव कदम गटास १२, तर दिनकरआबा गटास ८ जागा मिळाल्या. ८ आॅगस्ट १९९७ ला दोन्ही नेत्यांनी अविश्वास ठराव आणून दिनकरआबांना अध्यक्षपदावरून पायउतार केले. (क्रमश:)
‘तासगाव’ यंदा सुरू होणार का? सभासद, कामगारांत चिंता : नेत्यांविषयी नाराजी
By admin | Published: July 23, 2014 10:45 PM