सांगली : प्रदीर्घ काळ काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगलीलोकसभा मतदारसंघात गेली दहा वर्षे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. काँग्रेस विरोधी बाकावर असली तरी त्यांना निवडणूक लढण्यासाठीही सांगलीची जागा मिळणे कठीण झाले आहे. २०१९च्या निवडणुकीत घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ही जागा हस्तगत केली होती. आता दुसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने (उद्धव ठाकरे) यंदाच्या निवडणुकीत त्यांची याच जागेवरील दावेदारी मजबूत केली आहे. त्यामुळे यंदाही सांगलीची जागा काँग्रेसच्या हातून निसटण्याची शक्यता आहे.सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वसंतदादा घराण्याचे या मतदारसंघावर १९८० ते २०१४ या काळात तब्बल ३४ वर्षे वर्चस्व राहिले. २०१४ नंतर भाजपने सलग दोन निवडणुकांत काँग्रेसला धूळ चारली. २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे निवडणुकीतील अस्तित्व संपुष्टात आले. १९६२ नंतर प्रथमच या मतदारसंघात उमेदवारी यादीत काँग्रेसचा उमेदवार नव्हता. आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा ही जागा काँग्रेसच्या माध्यमातून लढण्याची तयारी स्थानिक नेत्यांनी केल्यानंतर यंदाही उमेदवारांच्या यादीत काँग्रेस असेल की नाही, याची कोणालाच खात्री नाही.शिवसेनेने (उद्धव ठाकरे) सांगली मतदारसंघावरील दावा मजबूत केला आहे. उमेदवार कोण असेल याचे संकेतही दिले आहेत. काँग्रेसचे नेते कितीही जोरदार दावा करीत असले तरी अशाच दावेदारीच्या वातावरणात मागील निवडणुकीत त्यांच्या हातातून ही जागा घटक पक्षाकडे गेली होती. यंदाही तसेच वातावरण आहे. पक्षाची ताकद असूनही ही जागा काँग्रेसला मिळण्यात येत असलेल्या अडचणी स्थानिक नेत्यांच्या अपुऱ्या प्रयत्नांचा परिणाम आहे. राज्य व केंद्र स्तरावर असलेला स्थानिक नेत्यांचा दबदबाही कमी झाल्याचे संकेत यातून मिळत आहेत.
पक्षाच्या अस्तित्वाचे काय?मागील निवडणुकीत विशाल पाटील हे काँग्रेसकडून दावेदार होते. स्वाभिमानी शेतकरी पक्षाला जागा गेल्यानंतर त्यांच्या तिकिटावर विशाल पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांचे अस्तित्व राखले गेले, मात्र काँग्रेसचे पुसले गेले. यंदा तशी संधीही दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस नेत्यांना अधिक सतर्क रहावे लागणार आहे.
वरिष्ठ नेत्यांचीही पाठगेल्या पाच वर्षात पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांसह अन्य वरिष्ठ नेत्यांनी सांगलीकडे दुर्लक्ष केले. पक्षाच्या आढावा बैठका, विविध सेलचे कार्यक्रम, मेळावे घेण्यात वरिष्ठांनी रस दाखविला नाही. स्थानिक स्तरावर काँग्रेसला बळ देण्याचा कार्यक्रम होत नसल्याची खंतही सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात आहे. हा बालेकिल्ला पुन्हा उभारण्याबाबत नियोजनबद्ध प्रयत्न दिसत नाहीत.
काँग्रेस नेत्यांचे चुकते कुठे?
- कृष्णा नदीत पाणी सोडण्यात सत्ताधाऱ्यांचे गैरनियोजन उजेडात येऊनही काँग्रेस नेते थंडच राहिले.
- पलूस-कडेगावचा अपवाद वगळता पाच वर्षात अन्य मतदारसंघात पक्षाचे मोठे मेळावे, कार्यक्रम झाले नाहीत.
- स्थानिकांच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात काँग्रेस मागे पडली.
- सामाजिक संस्था, संघटना आक्रमक होत असताना काँग्रेस नेते शांत राहिले.
- एकतेचा नारा देऊनही ऐन निवडणुकीत काँग्रेसमध्ये गटबाजीचे दर्शन घडते.
- निवडणुकांचा काळ वगळता जिल्हाभर जनसंपर्कात सातत्य नाही.