अशोक पाटील ।इस्लामपूर : शिराळा मतदारसंघात तीन गटांभोवतीच राजकारण फिरत आले आहे. आमदार शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार मानसिंगराव नाईक या दोघांच्या सत्तासंघर्षात काँग्रेसचे सत्यजित देशमुख यांना अद्याप उभारी आलेली नाही. आता वाळवा तालुक्यातील सम्राट महाडिक, अभिजित पाटील यांनाही शिराळा मतदारसंघ महत्त्वाचा वाटू लागला आहे. हे दोघेही उभे रहावेत म्हणून एका नेत्याने देव पाण्यात घातले आहेत.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर आमदार नाईक, मानसिंगराव नाईक आणि सत्यजित देशमुख विकासाचा डांगोरा पिटत आहेत. या मतदार संघातील डोंगरी भागाचा विकास झाला पाहिजे, मुंबईकडे वळणारा तरुण भागातच राहिला पाहिजे, यासाठी शिराळ्यात औद्योगिक क्षेत्र तयार केले, याचेही श्रेय लाटण्यासाठी नेते सरसावले. उद्योगांच्या नावाखाली नेत्यांच्या बगलबच्चांनीच तेथील भूखंड लाटले. त्यानंतर ते भूखंड चढ्या भावाने विकले, तर काहींनी अनुदान हाणले. त्यामुळे या परिसरातील युवकांच्या हाताला काम मिळालेच नाही. हाच मुद्दा घेऊन सम्राट महाडिक यांनी रणशिंग फुंकले आहे.
मतदारसंघातील वाळवा तालुक्यातील ४९ गावांतील तरुण सम्राट महाडिक यांच्या मागे असल्याचा दावा महाडिक युवा शक्तीकडून केला जात आहे. मात्र याचा आनंद राष्ट्रवादीतील नेत्यांना होत आहे. महाडिक गटाचा फटका आमदार नाईक गटाला बसेल, असा अंदाज बांधण्यात येत आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील शिराळा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची भाषा करत आहेत. त्यामागेही राजकीय खेळी असल्याची चर्चा आहे.कुणाची ताकद, कोण कमजोर?शिराळा मतदार संघात समाविष्ट, परंतु वाळवा तालुक्यातील ४९ गावांमध्ये आमदार जयंत पाटील यांची सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठी ताकद आहे. येलूर, पेठ जिल्हा परिषद मतदार संघात महाडिक गट वरचढ आहे, तर आमदार शिवाजीराव नाईक यांचाही ४९ गावात उल्लेखनीय लोकसंपर्क आहे. विविध फंडातून राष्टÑवादीचे माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी विकासकामे केली आहेत. निष्ठावान काँग्रेसचे मतदार बोटावर मोजण्याएवढेच राहिले आहेत. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची ताकद कमकुवत आहे.
२००९ च्या निवडणुकीत आम्ही मानसिंगराव नाईक यांना मदत केली. सम्राट महाडिक आणि अभिजित पाटील यांच्या भूमिकेने काहींचा फायदा होईल, असे वाटणे चुकीचे ठरेल. ते दोघे आमचे वडील शिवाजीराव देशमुख यांच्यापासून काँग्रेसच्या माध्यमातून एकत्र होते. आता त्यांनी त्यांच्या भूमिका बदलल्या आहेत. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण यांच्याशी चर्चा झाली आहे. आघाडी झाल्यास शिराळा मतदारसंघ काँग्रेसला देण्याची विनंती केली आहे.- सत्यजित देशमुख, प्रदेश सरचिटणीस, काँग्रेस.