सदानंद औंधेमिरज : मिरज लोंढा मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने मिरज बंगळुरू मार्गावर १५ जूनपासून विद्युत इंजिनावर गाड्या धावणार आहेत. मिरजेतून कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या विजेवर धावणार असल्याने रेल्वे प्रवास जलद होणार आहे.पुणे-मिरज-लोंढा मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण गेली सात वर्षे सुरू आहे. मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज या २८० किमी व दक्षिण पश्चिम रेल्वेच्या मिरज लोंढा या १६० किमी रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण करण्यात येत आहे. लोंढा मिरज दुहेरीकरणाचे काम पूर्ण झाले, मात्र विद्युतीकरणाचे काम बाकी होते. कुडची ते मिरज या २० किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण अंतिम टप्प्यात असून, १५ जूनपासून या मार्गावर विद्युत इंजिनावर रेल्वेगाड्या धावणार असल्याचे दक्षिण पश्चिम रेल्वेने जाहीर केले आहे.पुणे-मिरजदरम्यान एका मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने गेल्या वर्षभर मिरज पुणेदरम्यान विद्युत इंजिनावर रेल्वेगाड्या धावत आहेत. मात्र बेळगाव मिरजदरम्यान विद्युतीकरणाचे काम अपूर्ण असल्याने बंगळुरू ते पुणे धावणाऱ्या अनेक एक्स्प्रेस गाड्या डिझेल इंजिनावर सोडण्यात येत होत्या. या गाड्यांचे डिझेल इंजिन पुण्यात बदलून विद्युत इंजिन जोडण्यात येत होते. आता या रेल्वेमार्गावर रेल्वे इंजिन बदलण्याची गरज राहिली नाही.
पुणे ते लोंढा विद्युतीकरण पूर्ण झाल्याने पुणे-मिरज-बंगलोर दरम्यान सर्वच एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत. मध्य रेल्वेच्या पुणे-मिरज दुहेरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असून, हे दुहेरीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी वर्षभर लागणार आहे. मात्र मिरज - लोंढादरम्यान दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण झाल्याने १५ जूनपासून हरिप्रिया एक्स्प्रेस, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस, हुबळी-दादर एक्स्प्रेस, दादर तिरुनेलवेल्ली एक्स्प्रेस, अजमेर, जोधपूर, गांधी धाम एक्स्प्रेस या कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एक्स्प्रेस गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत.यामुळे रेल्वे प्रवास जलद होणार असल्याने प्रवाशांची सोय होणार आहे. पुणे - मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज स्थानकातून दक्षिण व उत्तर भारतात जाणाऱ्या नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू होणार आहेत. मुंबई-कोल्हापूर व मिरज-सोलापूर मार्गावर नवीन वंदे भारत एक्स्प्रेस गाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. हे दुहेरी रेल्वेमार्ग सुरू झाल्याने मिरज जंक्शन स्थानकाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.